महाराष्ट्रातील रस्ते बांधकामासाठी 2780 कोटींचा निधी मंजूर

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधींचा निधी जाहीर करण्यात आल्याचे गडकरी यांनी ट्विटरवरुन सांगितले.

गडकरी यांनी एकामागोमाग एक अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये खास करुन कोकणावासियांसाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या कामांसाठी 2780 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आलाय. नितीन गडकरी यांनी केलेल्या वेगवेगळ्या ट्विटमध्ये प्रगतीका हायवे या हॅशटॅग अंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग 166-ई वरील गुहागर चिपळूणला जोडणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी 171 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे गडकरी यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.
चिपळूणच नाही तर जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753-जे च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणाही गडकरींनी केली.