Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य

मुंबई, दि. १३ : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांनी नियोजित सर्व दौरे रद्द करून तात्काळ अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला अधिकची मदत देण्यात यावी अशी मागणी केली.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले.  या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून  जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.  झालेले नुकसान भरून न येण्यासारखे असले तरी राज्यसरकार कोणत्याही परिस्थितीत अतिवृष्टी व पूरग्रसत्तांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास श्री. वडेट्टीवार  यांनी व्यक्त केला.

Exit mobile version