ज्या टॅक्टरने सोयाबीन पेरले त्याच टॅक्टरने ऊपसले

दुबार पेरणी केलेल्या दहा एकरातील उभ्या सोयाबीनच्या पिकावर चालविला टॅक्टर

वर्धा-जिल्ह्यातील  शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला सोयाबीनचा घास निर्सगाने हिरावला आहे.  दहा एकरातील सोयाबीनला शेंगधारणाच झाली नसल्याने नैराश्यातून एका शेतकऱ्याने संपूर्ण पिकावर रोटावेटर फिरवित पीक नष्ट केले. समुद्रपूर तालुक्यातील परडा येथे हा प्रकार घडला. परडा येथील शेतकरी कवडू झिबलराव महाकाळकर यांचे गेल्या हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक नष्ट झाले होते. त्याची भरपाई त्यांना अद्याप ही मिळाली नाही. गेल्यावेळची भरपाई यंदाच्या हंगामात होईल चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा त्यांना होती. त्याच अपेक्षेने सोयाबीनचे महागडे बियाणे खरेदी करून त्यांनी आपल्या दहा एकर शेतात लागवड केली.

त्याकरिता उसनवारीच्या माध्यमातून पैशाची सोय करण्यात आली. दरम्यानच्या काळात पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्यामुळे त्यांनी पुन्हा सोयाबीनचीच दुबार पेरणी केली. दुबार पेरणीनंतर चांगला पाऊस झाल्याने पीकाला फुलधारणा देखील चांगली झाली. मात्र त्यानंतर सतत ढगाळ वातावरण असल्याने पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला. पीक वाचविण्यासाठी त्यांनी महागड्या कीटकनाशकाची फवारणी केली.

मात्र सोयाबीनला शेंगा लागल्या नाही. विविध उपाययोजना त्यांनी केल्या, कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतरही शेंगधारणा होत नसल्याने हताश झालेल्या कवडू महाकाळकर यांनी दहा एकरातील आपल्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरविण्याचा निर्णय घेतला. दहा एकरातील पीक नष्ट केल्याने त्यांचे सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान या प्रकाराची दखल घेत नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्यात यावी , अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.

शेतकऱ्याचे मनोगत

माझ नाव कवडुजी झिबलराव महाकाळकर मी माझ्या शेतातील उभ्या सोयाबीनच्या पिकावर टॅक्टर चालवीला कारण दुबार पेरणी करून सुद्धा सोयाबीन ला शेंगा न लागल्यामुळे हतबल होऊन सोयाबीन पिकावर रोटावेटर केले. पहीली १० ऐकर सोयाबीन पेरणी करीता ३०, ००० रूपये चे बियाणे व ५ ००० रूपये पेरणी करता खर्च, बियाणे पेरले पण उगवलेच नाही तर पुन्हा वखरणी करीता ५००० रुपये खर्च व दुसरी पेरणी करण्यासाठी ३०,००० रूपये चे बियाणे व पेरणी चा खर्च ५०००रुपये व दोन फवारणी चा खर्च १०, ००० रुपये व खत १०, ००० रुपये खर्च झाला. कमीत कमी उत्पन्न ३ लाख रुपये चे ते शेंगाच न लागल्यामुळे नुकसान झाले. एकूण उत्पन्न व खर्च धरून साडेचार ते पाच लाख रुपये चे नुकसान झाले. ही माझीच व्यथा नसून जिहयातील शेतकऱ्यांची व्यथा आहे. शासनाने पिडीत शेतकऱ्यांचा शेतीचे सर्वेक्षण करून, मोबदला द्यावा, अशी माझी मागणी आहे.