ऐन पावसाळ्यात कोळसाटंचाईने वीज निर्मिती अडचणीत

वेकोलीकडून कोळसा मिळत नसल्याने गंभीर स्थिती

मुंबई : पावसाळ्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये महाजेनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने त्वरीत योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महाजेनकोला दिलेत.केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडसह अन्य कोळसा कंपन्यांकडून ठरल्याप्रमाणे कोळसा मिळत नसल्याने निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी वेकोलीकडे नियमित कोळसा पुरवठ्यासाठी पाठपुरावा करा, असे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले.

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने थेट बैठकीतूनच डॉ. राऊत यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना दूरध्वनी करून नियमित व योग्य प्रमाणात कोळसा पुरविण्याची विनंती केली. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या राज्यातील खाणीतला कोळसा इतर राज्याच्या तुलनेने महागड्या दराने महाजनकोला विकत असल्याने ते माफक दराने देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी जोशी यांना केली.
गेल्या तीन महिन्यापासून केंद्र सरकारकडून महानिर्मितीसाठी अपेक्षित साठ्याच्या ५० टक्केच कोळसा प्राप्त झाला आहे.

राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाच्या उपलब्धतेचा ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळेस महानिर्मितीकडे उपलब्ध कोळसा आणि तो वाढविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यांची माहिती एका सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

सर्वसाधारणपणे ऐन पावसाळ्यात कोळशाची टंचाई वाढत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचेही निर्देश डॉ राऊत यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, महाजनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महाजनकोचे संचालक चंद्रकांत संचलन थोटवे, महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते.

विजेच्या मागणीत सतत वाढ होत असल्याने व कोळश्याअभावी वीज निर्मितीत घट झाल्याने महावितरणला खुल्या बाजारातून कमाल मागणीच्या वेळी महागड्या दराने वीज खरेदी करावी लावत असल्याने डॉ राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

भविष्यात कोळसा टंचाई होऊ नये यासाठी कोळसा मंत्रालययासोबत सतत पाठपुरावा करून अधिकचा कोळसा साठविण्यासाठी योग्य तरतूद करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. वीज टंचाईच्या काळात महावितरणला महागड्या दराने वीज खरेदी करावी लागत असल्याने कोळसा खरेदीसाठी महावितरणने अधिकची तरतूद करून ती रक्कम महाजनकोला दिल्याने महाजनकोला कोळसा खरेदी करणे सोपे जाईल, अशी सूचना डॉ राऊत यांनी केली. यासाठी वेकोलि, केंद्रीय ऊर्जा मंत्रालय,केंद्रीय कोळसा मंत्रालय यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा करण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोळसा उपलब्धता
२० सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार सध्या महानिर्मितीकडे १लाख ६३ हजार ५५० मेट्रिक टन कोळसा सध्या उपलब्ध आहे. वीज निर्मितीसाठी रोज किमान १लाख ४६ हजार ५५० मेट्रिक टन कोळसा लागतो. केंद्र सरकारच्या वेकोलीसह अन्य कंपन्याकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने ही गंभीर स्थिती ओढवल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला महाजनकोकडे १४ लाख मेट्रिक टन एवढा साठा उपलब्ध होता. परंतु कोळसा कंपन्यांकडून मागील दीड महिन्यात कमी पुरवठा झाल्याने जेमतेम एक दिवस पुरेल एवढा म्हणजे १ लाख ६३ हजार ८९५ मेट्रिक टन एवढाच साठा २० सप्टेंबरला उपलब्ध आहे.

केंद्र सरकारच्या या कंपन्यांकडून जुलै महिन्यात अपेक्षित कोळसा पुरवठ्याच्या केवळ ४७.९५ टक्केच कोळसा प्राप्त झाला. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पुरवठ्याच्या केवळ ५२.६४ टक्केच कोळसा पुरवठा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात १९ तारखेपर्यंत अपेक्षित पुरवठ्याच्या केवळ ४५.१६ टक्केच कोळसा पुरवठा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात वेकोलीकडून २२१६ मेट्रिक टन कोळसा मिळणे अपेक्षित असताना केवळ ८७३ मेट्रिक टन कोळसा म्हणजे केवळ ४५.१६ टक्के कोळसा प्राप्त झाला.
वीज निर्मिती कंपन्यांना नियमित कोळसा मिळावा म्हणून केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालयीन गटाच्या बैठकीत ऑगस्ट महिन्यापासून महानिर्मितीकडून ऑर्डर बुकिंग प्रोग्रामनुसार कोळसा पुरवठा केला जात नसल्याबद्दल वेळोवेळी तक्रार करण्यात आली. मात्र या गटाच्या बैठकीत कोळसा पुरवठ्याचे आश्वासन देऊनही अपेक्षित कोळसा पुरवला जात नसल्याकडे यावेळेस सादरीकरणाद्वारे लक्ष वेधण्यात आले.