Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सहकार कॉपट्यूब एनसीडीसी चैनेलचे उद्‌घाटन

“सहकाराची स्थापना आणि नोंदणी” याविषयी अठरा विविध राज्यांसाठी एनसीडीसीद्वारा निर्मित मार्गदर्शक व्हिडीओचेही प्रकाशन

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आज, सहकार कॉपट्यूब एनसीडीसी चैनेलचे उद्‌घाटन झाले. NCDC म्हणजेच, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा हा उपक्रम आहे. आत्मनिर्भर भारताच्या विविध पैलूंची अंमलबजावणी करण्यात कृषी मंत्रालय आघाडीवर आहे, असे तोमर यावेळी म्हणाले. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यात सहकार क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. तोमर यांच्या हस्ते यावेळी NCDC द्वारा निर्मित, “सहकाराची स्थापना आणि नोंदणी’ या विषयावरचा मार्गदर्शक  व्हिडीओचेही प्रकाशन करण्यात आले. अठरा  विविध राज्यांसाठी  हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत, केंद्र सरकारने अलीकडेच विविध उपाययोजना आणि कृषीमधल्या विविध क्षेत्रांसाठी आर्थिक पैकेज जाहीर केले, असे तोमर म्हणाले. “एक देश-एक बाजारपेठ’ निर्माण करण्याच्या या उपाययोजनांचा उद्देश, भारताला जगाच्या अन्नधान्याचे केंद्र बनवावे हा आहे. या सर्व सुधारणा आणि उपाययोजनांचे सार कृषीक्षेत्रातील सर्व उपक्रम आणि सेवा अधिक सक्षम करणे हेच आहे. कृषी पायाभूत सुविधा विकसित करणे, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, मूल्यसाखळी आणि मत्स्यव्यवसाय तसेच पशुपालनासाठीच्या सुविधा, वैद्यकीय आणि औषधी वनस्पतींची लागवड, मधुमक्षिका पालन आणि ऑपरेशन ग्रीन, यांचा या सुधारणांमध्ये समावेश आहे. कृषीक्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी कायद्यातही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

NCDCच्या उपक्रमाचे कौतुक करतांना तोमर म्हणाले की कृषीसाखळी मधील महत्वाचे धोरण, सहकारक्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवणे हे आहे. सहकार चळवळीला पुनरुज्जीवित करण्यासाठी नव्या सहकारी संस्था स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे . यासाठी, NCDC द्वारा निर्मित, “सहकाराची स्थापना आणि नोंदणी’ या   मार्गदर्शक  व्हिडीओची मदत होऊ शकेल. तसेच 10,000 कृषी उत्पादक संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या उपक्रमासाठी त्याची मदत होईल, असा विश्वास तोमर यांनी यावेळी व्यक्त केला. सहकरी तत्वावर कृषी उत्पादक संस्थांच्या स्थापनेत NCDC ची महत्वाची भूमिका आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील NCDC या संस्थेने सहकरी संस्थांना 1,54,000 कोटी रुपयांचे आर्थसहाय्य केले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सहकारी संस्थांची भारतातील भूमिका अत्यंत महत्वाची ठरली आहे.

Exit mobile version