Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी केंद्राला पत्र

मुंबई, दि.२४ : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी ( onion export ban) तातडीने हटविण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यांना पत्र पाठवले आहे.

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आता कुठेतरी बाजार सुरळीत होत होते. त्यातून अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने अचानकपणे कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असताना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे.

केंद्राने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी  रोहयो व फलोत्पादन मंत्री श्री भुमरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Exit mobile version