मुंबई, दि. 9: महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
श्री. थोरात म्हणाले, शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक पाहणीची अचूक नोंद होण्यासाठी राज्य शासनाने ‘ माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ ही मोहीम हाती घेतली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत 18 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले असून या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी देखील नोंदविली आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक पद्धतीने आपल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे.
जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. शिवाय या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणेदेखील सुलभ होणार आहे. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल केला आहे. आता ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांना स्वत:च आपण पिकवित असलेल्या पिकांची माहिती ॲपमध्ये भरणे सोपे होते. ई- पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होणार असल्याचे महसूलमंत्री म्हणाले.