जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद फिडरवर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर चक्राकार पद्धतीने प्रत्येकी चार तास कृषीपंपांना वीज पुरवठा केल्याने शेतीचे नुकसान झाले नाही, अशी माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानपरिषदेत दिली.
आमदार अंबादास दानवे यांनी भोकरदन तालुक्यात तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री डॉ. राऊत यांनी सविस्तर माहिती दिली.
ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, भोकरदन तालुक्यात महापारेषणचे २२० केव्ही उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात २५ एमव्ही क्षमतेचे २ पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातील एक ट्रान्सफॉर्मर ९ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८.४२ नादुरूस्त झाला. तातडीने त्याच दिवशी १० वाजता त्या ट्रान्सफॉर्मरवरील उपकेंद्रे दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर जोडण्यात आली. हसनाबाद उपकेंद्र सोडून आठ उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या कृषी फिडरवरील १२३० रोहित्रांवरील १० हजार ८७४ कृषीपंप ग्राहकांना चक्राकार पद्धतीने चार तास वीज पुरवठा करण्यात आला. या व्यतिरिक्त आठही उपकेंद्रावरील गावठाण फिडर २४ तास सुरू होते. परंतु १९ मेगावॉटचा भार कमी करणे आवश्यक असल्यामुळे उपलब्ध असलेल्या पर्यायी ३३ केव्ही वाहिनीचे देखभाल व दुरूस्तीचे काम करून हसनाबाद उपकेंद्र ११ फेब्रुवारी रोजी १३२ केव्ही राजूर उपकेंद्रावरून जोडण्यात आले. त्यामुळे हसनाबाद उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या ३७० रोहित्रांवरील सर्व २६१० कृषीपंपांना वीज पुरवठा सुरळीत झाला. त्यासोबतच नादुरूस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर काढून तेथे २५ एमव्हीचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला, असेही डॉ.राऊत यांनी सांगितले.
या चर्चेत आमदार चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर आदींनी सहभाग घेतला.