गडचिरोली जिल्ह्यात २०१८-१९ पासून जानेवारी २०२२ पर्यंत कृषिपंप वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या ४ हजार १३८ अर्जदारांपैकी १ हजार ३७४ अर्जदारांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित २ हजार ७६४ अर्जदारांना कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० नुसार प्राधान्याने वीज जोडण्या देण्यात येणार आहेत, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात पैसे भरुनही शेतकऱ्यांना कृषिपंपाना वीज जोडणी देण्याबाबत सदस्य कृष्णा गजबे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी उत्तर दिले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जुन्या वीज जोडणी धोरणामुळे सन २०१८-१९ पासून तीन वर्ष जोडण्या दिल्या जाऊ शकल्या नाहीत. त्यावेळच्या धोरणानुसार सुमारे १.२९ लाख जोडण्या देण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० आणले, नव्या धोरणानंतर एकाच वर्षात १.३४ लाख कृषि पंप वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. जो मागेल त्याला वीज जोडण्या देण्याचे धोरण असून जिल्हा नियोजन समितीमधून अथवा गावस्तरावरच्या निधीतून देखील यासाठी खर्च केला जाईल, असेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.