नोएडा : ही बातमी आहे दिल्ली आणि नोएडा परिसरातली. धान्य बाजारात शेतकऱ्यांना 5500 ते 6200 रुपये प्रतिक्विंटल दराने मोहरी पिकाला भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी प्रचंड खूश आहेत. नूह जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. येथील मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे. पाण्याची तीव्र टंचाई पाहता येथील शेतकरी मोहरी आणि गहू पिकवतात. दुसरीकडे ज्या गावात कालव्याचे पाणी उपलब्ध नाही, तेथे भाजीपाला, मसूर आदी पेरल्या जातात. कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याने बहुतांश शेतकरी मोहरीची पेरणी करतात.
जिल्ह्यात एक लाख 15 हजार 647 हेक्टर लागवडीयोग्य जमीन असून, यामध्ये एक लाख आठ हजार 111 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावेळी नूह जिल्ह्यात सुमारे ७४ हजार ५०० हेक्टरवर गहू, २९ हजार ५० हेक्टरवर मोहरी, ९४० हेक्टरवर बार्ली, १२४ हेक्टरवर हरभरा, ७९ हेक्टरवर मसूर, गाजर, सुमारे ४०० हेक्टरवर कांद्याची पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे यंदा मोहरीचे बंपर आणि निरोगी पीक आले आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे भावही चांगलेच आहेत. मोहरी पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) 5050 रुपये प्रति क्विंटल आहे, परंतु काही दिवसांपूर्वी बाजारात मोहरी 7,000 रुपये प्रति क्विंटलने विकली गेली आहे. मंडईंमध्ये मोहरीची आवक अधिक असल्याने पुन्हाणा धान्य बाजारात सध्या शेतकऱ्यांना ५५०० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. बाजारात मोहरीला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. पुन्हाणा धान्य मंडईत शनिवारपर्यंत 20669 क्विंटल मोहरीची आवक झाली आहे.