पर्यटन क्षेत्रात करिअर करण्यासाठी…

वेगवेगळे प्रदेश पाहणे, तेथील संस्कृतीशी ओळख करून घेणे, तेथील हवामान आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद थेणे अनेकांना आवडते. ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे अशांसाठी पर्यटन क्षेत्रातील करिअर ही अतिशय छान संधी आहे. आवडच करिअर झाल्यास मिळणारा आनंद मोठा असतो. पर्यटन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पर्यटन व्यवस्थापन आणि नियोजन या अभ्यास शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आल्या आहेत. अनेक देशी-परदेशी पर्यटन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे.

पर्यटन क्षेत्रात करिअर करण्यासाठी पात्रताः
ट्रॅव्हल आणि टुरिझम या विषयात पदवीसाठी बारावी पास आणि पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे. ही पदवी घेतल्यावर टूर मॅनेजमेंट या क्षेत्रात पदवी करण्याची संधी मिळते.

आवश्यक गुणः
या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असायला हवे. संवाद कौशल्य उत्तम आणि दोनपेक्षा अधिक भाषांवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. सहकार्यवृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असेल तर लोकांमध्ये पटकन एकरूप होणे सोपे होते. सामाजिक नीतिनियमांचा आणि परंपरांचा आदर करणेही गरजेचे असते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी.

कोणत्या विभागात काम करू शकता?
निवास, वाहतूक, अन्न, समारंभ, साहसी पर्यटन आदी सेवा देणारे हे क्षेत्र आहे. तुमच्या आवडीनिवडीनुसार यातील अनेक विभागात काम करता येईल.

संधीः
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पर्यटन विभागात नोकरीच्या संधी मिळतात. पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातूनही अनेक पदे भरली जातात. सरकारी नोकरीत येण्यासाठी मात्र या विषयातील पदवी असणे गरजेचे आहे. अनेक परदेशी कंपन्यांत नोकरीच्या संधीही आहेत. अनेक विमानसेवा कंपन्यांनाही या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. खाजगी समूहात व्यवस्थापन आणि आदी बाबींसाठी उत्तम वेतनही मिळते.

पर्यटन विभागः
आरक्षण, विपणन, विक्री, नियोजन, मार्गदर्शन यासाठी अनेक जागा भरल्या जातात. त्यामध्ये पर्यटनसंबंधी जागा आणि तिथे मिळणाऱ्या सेवांची तपशीलवार माहिती देण्याचे काम करणारा माहिती साहाय्यक, प्रादेशिक, पर्यटनस्थळांची सविस्तर आणि इत्यंभूत माहिती देणारा आणि सांस्कृतिक परंपरा सांगणारा गाईड, प्रवासाचे संपूर्ण नियोजन करणारे टूर ऑपरेटर्स, ग्राहकांशी संवाद साधून अनेक प्लॅन ते देणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सी अशा अनेक संधी आहेत. या संधींचे सोने करण्यासाठी येथे काम करणाऱ्या व्यक्तीकडे उत्तम संवाद कौशल्य असायला हवे.

हॉटेल क्षेत्रः
प्रवासात मुक्कामाची सोय करण्याचे काम एकमेकांच्या सहाय्याने केले जाते. जवळजवळ एक लाख कुशल मनुष्यबळाची गरज या व्यवसायाला सध्या आहे.

विमान कंपन्याः
विमान कंपन्यासाठी काम करणे ही वेगळा आनंद देणारी संधी असते. इतर व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्याने संधी मिळते. त्याचबरोबर आकर्षक वेतनही दिले जाते.

वाहतूक सेवाः
पर्यटन व्यवसायाला वाहतूक सेवा मोठा हातभार लावत असते. अनेक खाजगी सेवा देणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. आरक्षण आणि आकर्षक सवलती तसेच पॅकेज देण्याचे काम या क्षेत्रातील लोक करतात.

वेतनः
या क्षेत्रात पगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत पण हे उमेदवाराच्या योग्यतेवर अवलंबून असते.
काही प्रमुख उपलब्ध अभ्यासक्रम
• बॅचलर ऑफ टुरिझम अॅडमिनीस्ट्रेशन
• बॅचलर ऑफ टुरिझम स्टडीज
• मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन इन टुरिझम अँड हॉस्पीटॅलीटी मॅनेजमेंट
• एम.ए. इन टुरिझम मॅनेजमेंट
काही पदविका अभ्यासक्रम
• एअरलाईन टीकेटिंग
• एअरलाईन ग्राउंड ऑपरेशन्स
• ग्राउंड सपोर्ट अँड एअरपोर्ट मॅनेजमेंट
• गाईडिंग अँड एस्कॉर्टींग
• कार्गो मॅनेजमेंट
• एअरपोर्ट लॉजिस्टिक मॅनेजमेंट