चहाची चव घेणे, यात काय करिअर असू शकते, असे कुणालाही वाटेल. पण हो उत्तम चवी कळणाऱ्यांसाठी आणि त्याबद्दल अचूक सांगणाऱ्यांसाठी चहा-टेस्टर हा करिअरचा पर्याय अतिशय चपखल आहे. सध्याच्या काळात करिअरचे अनेक वेगवेगळे पर्याय निघाले आहेत, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यातील एक म्हणजे- चहा-टेस्टर.
चहा भारतात इंग्रजांनी आणला आणि त्यांनी भारतीयांना चहाची सवय लावली. असे असले तरी आता भारतातील बहुसंख्य लोकांची सकाळ चहा पिण्यानेच होते. त्यामुळे उद्योग भारतात चांगला प्रस्थापित आणि विकसित झाला आहे. भरभराटीस आला आहे. सध्या वेगवेगळे चहाची ब्रँडही तयार होत आहेत. तसेच सुट्या पद्धतीने मिळणाराही चहा आहे. चहाच्या टपऱ्यांवर किंवा ‘बोस्टन टी पार्टी’ किंवा ‘अमृततूल्य’सारख्या चहाच्या फ्रँचाईझीही आता प्रसिद्ध झाल्या आहेत.
अशावेळी चवीचे उत्तम भान असणाऱ्यांना चहा-टेस्टरचा पर्याय खुणावतो आहे.
चहा टेस्टर म्हणजे काय?
‘चहाची चव घेणारा’ हा चहा उद्योगातील महत्त्वाचा घटक आहे. चहाचा स्वाद घेणे ही पूर्णपणे एक कला आहे, परंतु आधुनिक चहा उद्योगातील करिअरमध्ये सुधारणा करण्यासाठी विज्ञानाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
रंग, चव आणि चवीने समृद्ध असलेल्या चांगल्या चहाची ओळख करण्यासाठी चहा-टेस्टरकडे त्याची जाण हवी. रंग आणि चव यांची तुलना करण्यासाठी आणि सुगंधांबद्दल मत व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडे मानक संदर्भ आहेत. ते संदर्भ द्यावे लागतात.
चहा टेस्टर हा निवडक चहाच्या गुणात्मक आणि कार्यात्मक तपशीलांची माहिती सेण्यास सक्षम असावा लागतो. चहा-टेस्टर होण्यासाठी कोणताही औपचारिक अभ्यासक्रम नाही. चहा व्यवस्थापन करिअरसाठी मूलभूत शिक्षण पुरेसे असले तरी, कृषी विज्ञान, वनस्पतिशास्त्र, अन्न विज्ञान, किंवा फलोत्पादन आणि/किंवा इतर संबंधित क्षेत्रातील पदवी असल्यास त्यामुळे फायदा होतो. अशा प्रकारच्या नोकऱ्यांसाठी स्वाभाविकपणे एमबीएची पदवी घेतल्यास त्याला प्राधान्य दिले जाते.
चहा टेस्टर होण्यासाठी आवश्यक गुणः
या करिअरसाठी काही आवश्यक कौशल्ये अंगी असावी लागतात. त्यामध्ये आवड, शारीरिक तंदुरुस्ती, चवींचे परीक्षण करण्याची क्षमता, मजुरांशी वागण्यासाठी नेतृत्व आणि संवादाचे गुण, पुढाकार घेण्याचे गुण, चहाच्या बाजारपेठेची ओळख, चहा लागवडीचे भौगोलिक ज्ञान, चहा लागवडीचे ज्ञान या बाबी आवश्यक आहेत.
कोर्सेस कुठे कुठे?
टी टेस्टर म्हणजेच चहा टेस्टरसाठी खास विशेष पदवी नसली तरी टी मॅनेजमेंटचे कोर्सेस देणाऱ्या संस्था आहेत. त्या अशाः चहा संवर्धन आणि तंत्रज्ञान विभाग, आसाम कृषी विद्यापीठ
दिप्रस इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज, कोलकाता
दार्जिलिंग टी रिसर्च अँड मॅनेजमेंट असोसिएशन, दार्जिलिंग
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फ्युचरिस्टिक स्टडीज, कोलकाता
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट, बंगलोर
चहा व्यवस्थापनात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यात चहाची चव घेणारा (टी-टेस्टर), चहा संशोधन, वृक्षारोपण- व्यवस्थापन, सल्लामसलत किंवा थिंक टँक, प्रक्रिया, लिलाव, ब्रँडिंग
विपणन करू इच्छिणारे आणि शकणारे यांना वाव आहे.
अबब… इतका मिळतो पगारः
या क्षेत्रात त्या त्या पोस्टप्रमाणे पगार मिळतो. हे नवीन करिअर असूनही, वेतनश्रेणी बऱ्यापैकी आहे. नवशिक्यांसाठी, पगार दहा ते पंधरा हजारांपासून पगार मिळतो ते नंतर ६० हजार किंवा लाखापर्यंतही पगार मिळू शकतो. जितका अनुभव, ज्ञान तसेच सर्जनशीलता तितका पगार जास्त.