लष्करातील शॉर्ट कमिशनद्वारे घडवा दर्जेदार करियर

लष्कराला मोठ्याप्रमाणात उत्कृष्ठ दर्जाच्या मनुष्यबळाची सातत्याने गरज भासते. त्यासाठी नियमितपणे उमेदवारांची निवड केली जाते. भारतीय लष्करात नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेगळे, आव्हानात्मक, दर्जेदार आयुष्य जगण्याची संधी प्राप्त होते.

गुणवत्ता, परिश्रम आणि अजोड कामगिरी याबळावर उच्च पदांवर जाण्याची संधी मिळते. कामगिरीचे समाधान मिळवून देण्याची क्षमता इथे मिळते. करियरची सुरक्षितता मिळते. सामाजिक दर्जा वाढतो.

परदेशातील प्रगत प्रशिक्षणाची संधी :
देशातील विविध ठाणी, प्रदेश, सीमा आणि परदेशातही लष्करीसवेत निवड झालेल्या उमेदवारांना आवशक्यतेनुसार कार्यरत राहावे लागते. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता पथकांमध्ये भारतीय लष्करी अधिकारी/जवानांचा समावेश केला जातो. जग भ्रमंतीची संधी यामुळे मिळते. परदेशातील प्रगत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात येते.

मिळतात विविध 61 प्रकारच्या सुविधा :
लष्करात नियुक्ती मिळालेल्यांना विविध 61 प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. यामध्ये विविध भत्ते असतात. मुलांच्या शिक्षणासाठी उत्तमोत्तम सोयी उपलब्ध करुन दिल्या जातात. यासर्वांमुळे आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यास साहाय्य होते. इतर शासकीय सेवा किंवा कार्पोरेट मधील समकक्षपदांपेक्षा अधिक वेतनभत्यादी सुविधा उपलब्ध होतात. या सेवांपेक्षा सामाजिक दर्जा आणि आणि सन्मान मोठ्याप्रमाणात मिळतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आणि समर्थ होण्यासाठी साहाय्य केले जाते. दर्जेदार आयुष्य जगण्याची संधी केवळ अधिकाऱ्यांनाच प्राप्त होत नाही तर कुटुंबियांनी प्राप्त होते. नियुक्ती होणाऱ्या ठिकाणी सर्वसोयी असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्याने व येत असल्याने कुटुंबियांची ससेहोलपट होत नाही.

संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास :
प्रशिक्षणाच्या काळात तांत्रिक, लष्करी आणि व्यवस्थापकीय कौशल्याचा समावेश करण्यात आल्याने संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होतो. इतर कोणत्याही सेवांमध्ये अशाप्रकारचे प्रशिक्षण प्राप्त होत नाही.

प्रशिक्षित अधिकाऱ्यांची कामिगिरी, शैक्षणिक अर्हता आणि गुणवत्ता बघून लष्कराच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डीआरडीओ सारख्या संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि शासनाच्या इतर संस्थांमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करण्याची संधी मिळू शकते. साहसी क्रीडा प्रकाराचे शिक्षण-प्रशिक्षण घेण्यासोबतच अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले दिले जाते.

निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन लागू होते. कुटुंबासह वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाते. सेवेमध्ये असताना ज्या कॅटिंन सुविधा मिळतात, त्याही पूर्ववत सुरु राहतात. विमा संरक्षण दिले जाते. निवृत्त झालेल्या ऑफिसर्सच्या पुनर्वसन आणि स्वयंरोजगारासाठी साहाय्य केले जाते. या अधिकाऱ्यांना देश- विदेशात तातडीने रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद/कोलकता/बेंगलुरु/इंदोर ), एक्सएलआरआय-जमशेदपूर, एमडीआय-गुरगाव, एनएमआयएस- मुंबई अशा नामवंत बिझिनेस स्कूल्स मध्ये प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, टुरिझम, लॉ, इन्शुरन्स, सुरक्षा व्यवस्था, मनुष्य बळ विकास,या विषयांशी निगडित प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले जाते.

लघुसेवा कमिशन
भारतीय लष्करामध्ये लघुसेवा कमिशनद्वारे सातत्याने महिला आणि पुरुषांची निवड तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी केली जाते. आपला करियरपथ त्यादिशेने ठरवण्याची संधी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मिळू शकते. तशी मनोभूमिका 12 वी नंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर बनवली व त्याबरहुकूम अभ्यास आणि शारीरिक क्षमता वृध्दीवर लक्ष केंद्रित केले तर ही संधी हस्तगत करणे अवघड जाणार नाही.लघुसेवा कमिशनद्वारे विविध शाखेतील अभियंते यांना तांत्रिक पदावर नियुक्ती मिळू शकते.

वयोमर्यादा- तांत्रिक पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या महिला व पुरुष उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षे या दरम्यान असावे. अभियांत्रिकी शाखेशी निगडित विविध पदांसाठी अर्हता – संबंधित पदाला लागणारी बीई अथवा बीटेक पदवी. पुरुष उमेदवारांची किमान उंची 157.5 सेमी असावी. त्याप्रमाणात वजन असावे. महिलांची किमान उंची 152 सेमी असावी आणि किमान वजन 42 किलोग्रॅम असावे. दृष्टी 6/6 अशी असावी. दृष्टी क्षमतावाढीसाठी केलेल्या रेडिअल कॅरॉटॉमी अथवा इतर कोणत्याही शस्त्रक्रिया केलेल्या उमेदवाराला प्रवेश प्रक्रियेपासून बाद ठरवले जाते. खडतर प्रशिक्षण सहन करण्यासाठी व त्यादरम्यान शारीरिक इजा होऊ नये म्हणून उमेदवार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक ठरते. प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी उमेदवारांनी 15 मिनिटात 2.4 किलोमीटर धावणे, 3 ते 4 मीटरचे दोरखंड चढून जाणे,25 उठाबशा करु शकणे, 13 पुशअप करु शकणे अशा बाबी साध्य कराव्यात असा सल्ला निवडमंळामार्फत देण्यात आला आहे.

निवड प्रक्रिया –
विविध तांत्रिक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यासाठीचे कटऑफ गुण लष्कराच्या मुख्यालयातील महासंचालक (नेमणुका) यांच्या कार्यालयात ठरवले जाते. या यादितील निवडक उमेदवारांना मुलाखत आणि चाचण्यासांठी बोलावले जाते. बंगलोर, भोपाळ आणि अलाहाबाद येथे होणाऱ्या या चाचण्यांमध्ये मानसशास्त्रीय कसोटी समूह चर्चा आणि मुलाखती यांचा समावेश आहे.
निवड प्रकिया दोन टप्प्यांमध्ये पार पाडली जाते. पहिल्या टप्प्यांमध्ये सर्व उमेदवारांचा समावेश असतो. या टप्प्यात यशस्वी ठरलेल्याच उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी कायम ठेवले जाते. पहिल्या टप्प्यात अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परत पाठवले जाते. सेवा निवड मंडळामार्फत निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते. या वैद्यकीय चाचणी अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना यानिकालाविषयी अपिल करण्याची संधी दिली जाते. 42 दिवसांमध्ये अपिल मेडिकल बोर्डाकडे अपिल करता येते. याप्रक्रियेत निवड संचालनालयाचा कोणताही सहभाग आणि हस्तक्षेप असत नाही. वैद्यकीयदृष्ट्या पूर्णपणे सक्षम उमेदवारांचीच अंतिम यादीसाठी निवड केली जाते. वैद्यकीय चाचणीच्या आधी उमेदवारांनी टॉन्सिल, पाइल्स, कानातील मळ, अतिरिक्त वजन आदींबाबत योग्य खबरदारी घ्यायला हवी.

पदांच्या उपलब्धतेनुसार अंतिम यादीतील गुणवत्ता क्रमांकाप्रमाणे उमेदवारांना चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येते. प्रशिक्षणाचा कालावधी 49 आठवड्यांचा असतो. प्रशिक्षण काळात दरमहा 21 हजार रुपयांच्या आसपास स्टायपंड दिले जाते.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पदांसाठी लागू असलेले वेतन आणि भत्ते सुरु होतात. प्रशिक्षण कालावधित उमेदवारांना लग्न करता येत नाही. या कालावधित पालकांसोबत राहण्याची परवानगी दिली जात नाही. ऑफिसर्स ट्रेनिंग ऍ़केडमीमधील प्रशिक्षण पूर्ण झाल्याशिवाय उमेदवारांनी लग्न करु नये. या प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी सहभागी होण्याआधी लग्न केल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. प्रशिक्षण काळात लग्नबंधनात अडकल्यास उमेदवारांना प्रशिक्षणातून मुक्त केले जाते. त्या वेळेपर्यंत संबंधित उमेदवारावर लष्कराने केलेला संपूर्ण खर्च वसूल केला जातो.

हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर उमेदवारांना मद्रास विद्यापीठाची पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट ऍ़ण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज ही पदव्युत्तर पदविका प्रदान केली जाते.

10 वर्षासाठी नियुक्ती :
निवड झालेल्या उमेदवारांना लष्कराच्या देशविदेशातील कोणत्याही ठिकाणी/केंद्रावर काम करावे लागते. निवड झालेल्या उमेदवारांना प्रांरभी 10 वर्षासाठी नियुक्ती दिली जाते. त्यानंतर ही नियुक्ती उमेदवाराची गुणवत्ता आणि क्षमता बघून पुढे 4 वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते. ज्या पुरुष उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती हवी असेल त्यांना 10 वर्षाच्या प्रारंभिक नियुक्तीनंतर, त्यांची गुणवत्ता आणि आतापर्यंतची कामगिरी बघून अशी नियुक्ती मिळू शकते. महिला उमेदवारांना कायम स्वरुपाची नियुक्ती (कमिशन )दिले जात नाही.

प्रशिक्षणानंतर उमेदवाराची निवड लेफ्टनंट या पदावर होते. पुढे दोन वर्षांनी तो कॅप्टन, सहा वर्षांनी मेजर, 13 वर्षांनी लेफ्टनंट कर्नल या पदांपर्यंत कालबध्दरीत्या पदोन्नत होतो. त्यापुढे सेवा नियमांनुसार निवड पध्दतीने कर्नल, ब्रिगेडिअर, मेजर जनरल , लेफ्टनंट जनरल आणि त्यापुढे पदोन्नत होऊ शकतो.