आणखी दोन दिवस राज्यात थंडीची लाट

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून पुढील दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पारा घसरुन १० अंशांच्यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात जमिनीलगतचे वारे पूर्व दिशेने वाहत असून, ते उत्तरेकडून वळून राज्यात येत आहेत. त्यामुळे या परिसरात थंड व कोरडे वारे वाहण्याची शक्यता आहे.

या वाऱ्याची तीव्रता अधिक असल्याने राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत या वाऱ्यांचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढणार आहे.