कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन मिळणार खुल्या बाजारात

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी आता खुल्या बाजारात म्हणजे रुग्णालयांमधून विकत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही लस आता ४२५ रुपयांना मिळेल. त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. औषध नियंत्रक महासंचलकांनी ही परवानगी दिली आहे.

याबाबत सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने परवानगी मागितली होती. यानंतर कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरीता केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था यांच्या तज्ज्ञ पथकाने केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. तसेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला परवडण्यायोग्य दरामध्ये लसींना उपलब्ध करुन देण्यासाठी लसींच्या दरांवर मर्यादा आणण्याच्या दिशेने काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

दरम्यान, या शिफारशींमध्ये या दोन्ही कोरोना लस सुमारे 275 रुपये प्रति डोस आणि 150 रुपयांच्या अतिरिक्त सेवा शुल्कासह उपलब्ध करुन देण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे कळते. सध्या खासगी रुग्णालयांत कोव्हॅक्सिन लसीसाठी प्रतिडोस 1,200 रुपये तर कोविशील्डसाठी 780 रुपये शुल्क आकारले जाते. या किंमतींमध्ये 150 रुपये सेवा शुल्काचाही समावेश आहे.