राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मुंबई : द्राक्षांपासून तयार केली जाणारी वाईनची दुकानांमधून विक्री करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध होणार आहे.
याबाबत अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “राज्य सरकारने वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला असून एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या दुकानांत वाईन विकता येईल. ही वाईन सध्या बार किंवा मद्याच्या दुकानांतच मिळते. ती आता ग्रोसरी स्टोअरमध्येही मिळू शकेल.”
फायदा शेतकर्यांना
या धोरणाचा फायदा शेतकर्यांना होईल, असा दावा मलिक यांनी या वेळी केला. राज्यात वायनरींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या निर्णयचा त्यांना फायदा होईल. भाजपने गोव्यात, हिमाचलमध्ये, तसेच इतर भाजपशासित राज्यात हेच धोरण आणले आहे. तसेच धोरण महाराष्ट्राने आखले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात वाईन उत्पादनासाठी दहा वर्षे अबकारी कर माफ होता. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले, असेही त्यांनी सांगितले.