पिकाचे नुकसान व्हावे म्हणून अघोरी प्रकार

गलांडवाडी नं. २ (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत जादूटोणा केल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हनुमंत माणिक शिंदे (वय ५८, रा. गलांडवाडी नं. २, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दिली आहे.

इंदापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हे गलांडवाडी नं. २ येथे परिवारासह राहत असून शेती व्यवसाय करतात. शुक्रवारी (ता. १४ ) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी डेट असताना त्या ठिकाणी नारळ, टाचण्या टोचलेले लिंबु, गांधी टोपी, बागायतदार, नैवेद्य, अंडी, हळद-कुंकु, कापुर, आगरबत्ती अशा अनेक लहान मोठ्या वस्तू दिसून आल्या.

यावेळी हनुमंत शिंदे यांनी घरी येऊन घरच्यांशी चर्चा केली कि शेतामध्ये पुजा वगैरे केली आहे का असे विचारले असता पत्नी व भाउजय यांनी सांगितले की आम्ही शेतात कसल्याही प्रकारची पुजा वगैरे केली नाही. त्यावर घरातील सर्वजण शेतात जावून पाहणी केली असता सदर ठिकाणी वरील प्रमाणे पूजा केलेली दिसुन आली. हनुमंत शिंदे यांची भाऊजय रत्नप्रभा शिंदे यांनी सांगितले कि, यापूर्वी ही आपले शेतात अशा प्रकारे आमवस्या व पौर्णिमेच्या दिवशी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बऱ्याच वेळा पूजा केली होती. तेव्हा हनुमंत शिंदे यांनी सदरील साहित्य फेकून दिले.

दरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे शेत पिकू नये, आर्थिक नुकसान, मृत्यू व दुखापत घडवून आणण्याच्या उद्देशाने व कुटुंबियांच्या मनामध्ये भिती निर्माण करून शेतात नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा करून शेतात पूजाअर्चा केल्याचे वारंवार दिसून आले आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने घटनेचा फोटो घेऊन इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दाजी देटे करीत आहेत.