लसीचा दुसरा डोस चुकविणारे तब्बल १ कोटींच्यावर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना लसीचा दुसरा डोस लांबविणा-या नागरिकांमुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील सुमारे एक कोटींहून अधिक नागरिकांनी त्यांच्या लसीचा दुसरा डोस घेतलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी हा डोस लवकरात लवकर घ्यावा यासाठी प्रशासनाने त्यांची जागृती करावी असे आरोग्य विभागाने सुचविले आहे. पुण्यात तब्बल ९ लाख ९३ हजार जणांनी कोव्हिशिल्डचा दुसरा डोस चुकवला आहे.

राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल १.१४ कोटी नागरिकांनी दुसरा डोस घेण्याचे लांबविले आहे. त्यात ९७.६१ लाख नागरिकांना कोव्हिशिल्डचा तर १७.३२ लाख नागरिकांना कोव्हॅक्सिनचा डोस घेणे बाकी आहे.

राज्याच्या लसीतकरण अधिका-यांच्या मते दुस-या डोससाठी नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी लसीकरणबाबत जनजागृती तसेच घरोघरी जाऊन नागरिकांना तो घेण्यासाठी बाहेर काढणे असे सर्व उपाय करून झालेत परंतु त्याचा पुरेसा फायदा झालेला दिसत नाही. दुसरा डोस न घेतलेल्यांची यादी अद्ययावात करून ती संबंधित जिल्हाधिका-यांना दिली असल्याचे या विभागातील अधिका-यांनी सांगितले. नोडल अधिका-यांमार्फत अशा लाभार्थ्यांचा पाठपुरावा करणे ही संबंधित जिल्ह्यांची जबाबदारी आहे, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नागपूरमध्ये कोव्हिशिल्डडचा दुसरा डोस न घेणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. बुलडाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस चुकविलेल्यांची संख्या जास्त आहे.

गेल्या १० दिवसांत दररोज सरासरी ३ ते ५ लाख लाभार्थ्यांना लस दिली जात आहे. पूर्वी ही संख्या ८ ते १० लाख इतकी होती. त्यामुळे आता लस घेणा-यांची सख्या कमालीची घटली आहे. राज्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ९० टक्के असून दुसरा डोस घेतलेले सुमारे ६६ टक्के आहेत. राज्याने सध्या १.५ लसीचे डोस दिले असून १ कोटी कोव्हिशिल्ड आणि २० लाख कोव्हॅक्सिनचे डोस शिल्लक असल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली. हे शिल्लक डोस महिनाअखेरपर्यंत संपतील असेही त्यांनी सांगितले.