राज्यात १ फेब्रुवारीपासून तमाशाला परवानगी

राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यानंतर आता तमाशालाही परवानगी देण्यात आली असून येत्या १ फेब्रुवारीपासून पुन्हा ढोलकीचा आणि घुंगरांचा आवाज पुन्हा गुंजणार आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. दोन्ही डोस घेतलेल्या आणि युनिव्हर्सल पास असलेल्या व्यक्तींना त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच आता तमाशा कलावंतांसाठीही मोठी बातमी आली आहे.

ग्रामीण भागातील जत्रांमध्ये मुख्य आकर्षण ठरणारे तमाशे आणि लावणी कलावंतांसाठी आता १ फेब्रुवारीपासून राज्यात तमाशांना सरकारने परवानगी दिली आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अखेर राज्यात १ फेब्रुवारीपासून तमाशा सुरू करण्यात मुभा दिली आहे. कोरोना काळात नुकसान झाल्याने तमाशा कलावंतांसाठी सरकारने १ कोटी रुपये जाहीर केल्याची माहिती खेडकर यांनी दिली.