राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीतील कोरोना रुग्णांची संख्या २५ पटींनी वाढली असली तरी मृत्यूंची संख्या तब्बल ३७ टक्क्यांनी घटली आहे. नोव्हेंबरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सुमारे २६ हजार होती, तर हीच संख्या १८ जानेवारीपर्यंत तब्बल ६ लाख ६.४३ लाख इतकी झाली आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये मात्र, कोरोना मृत्यू निम्मयाने घटले होते.
गेल्या नोव्हेंबरमध्ये कोरोनामुळे ४७२ जणांचा मृत्यू झाला. परंतु हा आकडा डिसेंबरमध्ये निम्म्याने कमी होऊन २३१ वर आला. डिसेंबरमध्येच ओमायक्रॉनचा संसर्ग सुरू झाला होता. त्यानंतर जानेवारीच्या १ ते १८ या कालावधीत राज्यात २९८ मृत्यूंची नोंद झाली. हा आकडा नोव्हेंबरच्या तुलनेत ३७ टक्क्यांनी कमी आहे.
या महिन्यात जरी कोरोनाच्या मृत्यूंमध्ये वाढ झाली असली तरी कोरोना रुग्णसंख्येच्या तुलनेत हा आकडा अतिशय कमी आहे. राज्यात सध्या कोरोनाचा मृत्यूदर हा ०.०५ टक्क्यांवर घसरला असून महासाथ सुरू झाल्यानंतरचा हा सर्वांत कमी आकडा आहे, असे मत सार्वजनिक आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केले.
याबाबत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, “दुस-या लाटेत, जी डेल्टाची होती, तुलनेत या लाटेतील महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. ही जमेजी बाजू आहे. सध्या सहव्याधीग्रस्त रुग्ण आणि आजाराला खिळून असणा-या रुग्णांचाच कोरोनामुले मृत्यू होत आहेत. सशक्त लोक एकतर विनालक्षणे आहेत किंवा त्यांना सौम्य ते मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. दुस-या लाटेत विषाणूचा संसर्ग तीव्र असल्याने लक्षणांची तीव्रता जास्त होती.”
सध्या वाढत असेलली कोरोनाबाधितांची संख्या लवकरच कमी होईल. त्यामुळे सहाजिकच मृत्यूंची संख्याही कमी होईल. गेल्या एक ते दीड महिन्यांमध्ये मृत्यूंमध्ये चिंताजनक वाढ नोंदविली नसल्याचे आवटे यांनी सांगितले.
ज्यांना तीव्र स्वरुपाच्या व्य़ाधी आहेत असेच लोक कोरोनाला बळी पडत आहेत. हे मृत्यू कोरोनामुळे जरी असले तरी ते केवळ कोरोनामुळे नाहीत हा त्यातील फरक आहे. मात्र, या रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग होत नसल्याने हे मृत्यू कोरोनाच्या नेमक्या कोणत्या प्रकारामुळे होत आहेत हे सांगणे मुश्किल आहे, असे मत राज्य कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.