रेल्वेमार्फत नाशवंत उत्पादनांच्या पुरवठ्याची साखळी सुरळीत राहण्याची आशा, ‘पी’ श्रेणीअंतर्गत नियमित पार्सल भाडे आकारल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार
अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे, देशातील पहिली “किसान रेल” देवळाली ते दानापूर दरम्यान आज 07 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता सुरु करण्यात आली . केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास आणि पंचायती राजमंत्री नरेंद्र सिंग तोमर, रेल्वे, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रेल्वेचा शुभारंभ केला.
ही रेल्वे साप्ताहिक असून सुरुवातीला 10 +1 अशी डब्यांची रचना असेल. रेल्वे 1519 किलोमीटरचा प्रवास 31:45 तासांत पूर्ण करुन दुसऱ्या दिवशी 18:45 वाजता दानापूर येथे पोहचेल.
केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 मध्ये अर्थमंत्र्यांनी नाशवंत पदार्थ यात दूध, मांस आणि मासे यांच्या पुरवठ्याच्या राष्ट्रीय शीत साखळीविषयी घोषणा केली होती. तसेच भारतीय रेल्वे “किसान” रेल सुरु करणार असेही जाहीर केले होते.
रेल्वेच्या माध्यमातून नाशवंत पदार्थांची अखंड पुरवठा साखळी निर्माण केली जाणार आहे. ही रेल्वे म्हणजे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. किसान रेलच्या प्रारंभासह शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे भारतीय रेल्वेचे ध्येय आहे. या रेल्वेच्या माध्यमातून फळे, भाजीपाला अशी नाशवंत कृषी उत्पादने अगदी अल्प काळात बाजारपेठेत पोहोचतील. फ्रोजन कंटेनरची सुविधा असल्यामुळे या रेल्वेच्या माध्यमातून मासे, मांस आणि दूध यासह नाशवंत पदार्थांची सुरळीत साखळी निर्माण करता येईल.
मध्य रेल्वे विभागात भुसावळ विभाग हा प्रामुख्याने कृषीप्रधान विभाग आहे. नाशिक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात ताजा भाजीपाला, फळे, फुले, कांदे आणि इतर कृषी उत्पादने आणि नाशवंत पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. ही उत्पादने प्रामुख्याने पाटणा, प्रयागराज, कटनी, सतना याठिकाणी पाठवले जातात.
- रेलला नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय नगर आणि बक्सर याठिकाणी नियोजीत थांबे देण्यात आले आहेत.
प्रमुख जोडी स्थानकाचे शुल्क खालीलप्रमाणे आहेतः
प्रति टन भाडे:
नाशिक रोड/ देवळाली ते दानापूर | रु. 4001 |
मनमाड ते दानापूर | रु. 3849 |
जळगाव ते दानापूर | रु. 3513 |
भुसावळ ते दानापूर | रु. 3459 |
बुऱ्हाणपूर ते दानापूर | रु. 3323 |
खांडवा ते दानापूर | रु. 3148 |
यापूर्वी भारतीय रेल्वेने केळी आणि इतर एकल पदार्थांच्या निर्यातीसाठी विशेष रेल्वे चालवली आहे. मात्र, ही पहिलीच बहुपयोगी गाडी असून ती डाळिंब, केळी, द्राक्षे या फळांसह शिमला मिरची, फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, पत्ताकोबी, कांदे, मिरच्या या भाज्यांची वाहतूक करणार आहे. स्थानिक शेतकरी, मजूर, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर व्यक्तींच्या सहाय्याने प्रभावी विपणन करण्यात येणार आहे. मागणीची एकत्रित नोंद केली जाईल.
या रेल्वेला उत्तम प्रतिसाद मिळून शेतकर्यांना मोठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांकडून ‘पी’ श्रेणीअंतर्गत नियमित पार्सल भाडे आकारण्यात येणार आहे.