ओमायक्रॉनपासून संरक्षण देऊ शकते साधी सर्दी

कोरोनाच्या ओमायक्रॉन या प्रकाराची लागण झाल्यास सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, खोकला आणि काहिंना ताप अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे साधी सर्दी झाली तरी आपल्याला चिंता वाटते कोरोना तर झाला नसेल ना. पण घाबरू नका. हीच साधी सर्दी तुम्हाला या ओमायक्रॉनपासून संरक्षण देऊ शकते. ब्रिटनमधील एका संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. आणि हे संशोधन दोन भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी केले आहे.

सामान्यपणे सामान्य सर्दी ही कोरोना विषाणूंच्या प्रजातींपैकीच काही सौम्य क्षमतेचे विषाणूंमुळे होते. या सर्दीला प्रतिकार करण्यासाठी शरिरामध्ये टी सेल्स (पेशी) तयार होतात. या टी पेशी कोव्हिड-१९ च्या विषाणूच्या संसर्गाचा धोका कमी करतात. त्यामुळे सामान्य सर्दीचा त्रास असणाऱ्यांना सार्स-कोव्ही २ चा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती ब्रिटनमधील एका संशोधनामधून समोर आली आहे.

लंडनमधील इम्पिरियल महाविद्यालयातील डॉ. रिया कुंडू आणि प्रा. अजित ललवाणी या भारतीय वंशाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार टी पेंशीमुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती ही सध्याच्या कोरोनाविरोधात लढण्यास सक्षम असल्याचा पुरावा पहिल्यांदाच मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोरोनात प्रतिकारक्षमता एक महत्त्वाची भूमिका बजावते. लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर प्रतिपिंडे (अन्टिबॉडी) कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे टी पेशी या कोरोनापासून संरक्षण देण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या संशोधनाला सप्टेंबर २०२० मध्ये सुरूवात झाली. यात ज्यांना यापूर्वी कोरोना झाला होता अशा ५२ घरांचा समावेश करण्यात आला. त्यांच्यामध्ये साध्या सर्दीमुळे निर्माण झालेल्या टी पेशींची संख्या तपासण्यात आली. त्यानुसार ज्या २६ जणांमध्ये कोरोनाचा संर्सग झाला नाही, अशांमध्ये टी पेशींची संख्या जास्त होती. तर ज्यांना कोरोना झाला त्यांच्यात हे प्रमाण कमी होते.

टी पेशींमुळे किती काळ संरक्षण मिळेल हे सांगता येत नाही. याबाबत डॉ. कुंडू म्हणाल्या, “साध्या कोरोना विषाणूमुळे झालेल्या सर्दीतून निर्माण झालेल्या टी पेशींमुळे सध्याच्या कोरोनाला अटकाव होतो. सार्स कोव्ह २ विषाणूमुळे तयार होणारे अंतर्गत प्रथिने हे लस तयार करणा-यांसाठी एक पर्यायी प्रथिने ठरू शकते. सध्याची लस ही स्पाईक प्रथिनांना लक्ष्य करते ते कायम बदलत (म्युटेशन) असते,जसे की सध्याचा ओमयक्रॉन प्रकार जो लसीची परिणामकारकतेला जुमानत नाही. याबाबत डॉ. ललवाणी म्हणाले, “त्या तुलनेत आम्ही लक्ष्य केलेला अंतर्गत प्रथिने मात्र, अतिशय कमी प्रमाणात बदलतो.”

कोरोना विषाणूंपैकी काही विषाणू हे फार सौम्य असतात. यापैकीच काही ठराविक विषाणूंचा संसर्ग झाल्यास सामान्य प्रकारची सर्दी आणि इतर तत्सम त्रास होतात. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, संशोधकांचं असं म्हणणं आहे की सामान्य सर्दीसाठी कारणीभूत असणाऱ्या विषाणूंमुळे शरीरामध्ये निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती ही कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत करु शकते.