मुंबईत ४६ वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी काहीशी विश्रांती घेतली असली तरी गुरुवारी सकाळी पुन्हा जोर सुरू झाला. येत्या २४ तासांत मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने मुंबईकरांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, एकूण परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
४६ वर्षांनंतर विक्रमी नोंद
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कुलाबा परिसरात १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २६२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर बुधवारी या ठिकाणी २९३.८ मिमी पावसाची नोंद झाली.
अशी उडाली दाणादाण
मुंबई, ठाणे परिसरात बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि मुंबई, पालघर, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग जलमय झाले होते. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील बचावकार्यात उतरले होते. कोकणातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले होते. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झाली आहे.
मुंबई मनपाच्या तलावांची स्थिती
मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांमधील पावसाच्या चांगली हजेरी लावली. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार तलावांमध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ३३ हजार ४११ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली. त्यामुळे तलावांतील जलसाठा पाच लाख ३९ हजार ३०७ दशलक्ष लिटरवर पोहोचला. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोडकसागरमध्ये २८ मि.मी., तानसामध्ये ६७ मि.मी., मध्य वैतरणामध्ये १४ मि.मी., तुळशीमध्ये ७४ मि.मी., विहारमध्ये ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली.
विहार तलाव ओव्हरफ्लो

महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महापालिकेचा ‘विहार तलाव’ बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी ३१ जुलै २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर २०१८ मध्‍ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

२६ जुलैच्या अतिवृष्टीच्या आठवणी झाल्या ताज्या

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं असून दृश्यमानता कमी झाली आहे. दादर, हिंदमाता परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात, दादर ते लालबाग जाणा-या रस्त्यावरील वाहने अन्य मार्गाने वळवली आहे. २००५ नंतर आज सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचं काम सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच गरजेशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.