राज्यातील सलून, व्यायाम शाळा 50 टक्के क्षमतेने पूर्ण ‘लसीकृत’ कर्मचाऱ्यांमार्फत चालवण्यास मुभा

मुंबई, दि.9 :- शनिवार दि. 8 जानेवारी 2022 रोजी राज्य शासनातर्फे सोमवारपासून लागू होणाऱ्या निर्बंधांसंबंधी काढण्यात आलेल्या आदेशात अंशत: सुधारणा करण्यात आल्या आहेत. आदेशानुसार ब्युटी सलून आणि व्यायाम शाळांना 50 टक्के क्षमतेने, मास्कचा उपयोग करून व पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देता येईल कोणतेही नवीन आदेश येईपर्यंत हेच आदेश अमलात राहतील.

या सुधारणा खालील प्रमाणे असतील :

1- तक्त्यामध्ये उल्लेखित ‘प्रस्तावित निर्बंध’ याचा अर्थ “लागू निर्बंध” असा गृहीत धरण्यात येईल.

2- ब्युटी सलूनचा समावेश “केश कर्तनालय” (किंवा हेअर कटिंग सलून) या गटात करण्यात येईल. त्यांनाही क्षमतेच्या टक्के उपस्थितीत सलून उघडे ठेवण्याची परवानगी असेल व सोबतच केश कर्तनालय/ हेअर कटिंग सलून करिता उल्लेखित निर्बंध लागू असतील. या आस्थापनांमध्ये फक्त अशीच सेवा देण्यास मुभा असेल की, ज्यामध्ये मास्क काढण्याची गरज नसते. या सेवेचा लाभ केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल. त्याचप्रमाणे ब्युटी सलून मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल.

3- जिम अर्थात व्यायामशाळा हे क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत चालू ठेवता येतील, तथापि तिथे मास्क लावणे बंधनकारक असेल. या सेवेचा लाभ देखील केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल. त्याचप्रमाणे व्यायामशाळेशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल.

सदर आदेश राज्याचे मुख्य सचिव देबाशिष मुखर्जी यांनी दिले आहेत.