कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थकीत रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत मिळविण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येत्या मार्चपर्यंत चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेत पश्चिम महाराष्ट्रातील ६ लाख ४५ हजार ८१२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी १ लाख ९४ हजार ३८१ शेतकऱ्यांनी थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत घेत संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे.
थकबाकीमुक्तीसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून गावोगावी जनजागृतीपर शेतकरी मेळावे व संवाद मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकर्यांना वीजबिलाबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ व सहभाग घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नाळे यांनी केले आहे.
पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६ लाख ४५ हजार ८१२ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीचे एकूण ९२९ कोटी ५४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना भरलेल्या थकबाकीएवढीच ४३२ कोटी ३० लाख रूपयांची माफी तसेच निर्लेखन, व्याज व विलंब आकारातील सवलतीचे १२३९ कोटी असे एकूण १६७१ कोटी ३० लाख रूपयांची मूळ थकबाकीमध्ये सूट मिळाली आहे.
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांनी राज्यात आघाडी घेतली असून आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३८१ शेतकर्यांनी योजनेचा लाभ घेत संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे. या शेतकऱ्यांकडे ५९६ कोटी ३० लाख रूपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी चालू वीजबिलाचे १०८ कोटी ३२ लाख रुपये आणि सुधारित थकबाकीमधील ५० टक्के म्हणजे २९८ कोटी २७ लाख रूपयांचा भरणा केला आहे. वीजबिल कोरे करण्यासाठी या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारातील सूट, निर्लेखन याव्यतिरिक्त थकबाकीमधील आणखी २९८ कोटी २८ लाख रुपयांच्या माफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ६१ हजार ८२६ तर सातारा जिल्हा- ६० हजार ८२९, पुणे जिल्हा- ३३ हजार ८८८, सांगली जिल्हा- २७ हजार ७५०, आणि सोलापूर जिल्ह्यातील १० हजार ८८ शेतकरी वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झाले आहेत.