गृहविलगीकरणाचा कालावधी आता सात दिवसांचा

कोरोनाची बाधा झाल्यानंतर गृह विलगीकरणाचा कालावधी १० दिवसांवरून सात दिवस करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंबंधीची नवी नियमावली आज जाहीर केली. गृह विलगीकरणात काय काळजी घ्यावी, किती दिवस विलगीकरणाता राहावे, याबाबत यात सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या नव्या नियमावलीनुसार यापूर्वी गृह विलगीकरणाचा कालावधी दहा दिवसांचा होता. सलग तीन दिवस ताप नसल्यास दहा दिवसांनंतर हा गृह कालावधीतून सूट मिळत होती. आता हा कालावधी सात दिवसांवर आणण्यात आला आहे. सलग तीन दिवस ताप नसल्याने रुग्णांना चाचणी केल्यापासून सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विलगीकरणातून बाहेर येता येईल, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यानंतर कोरोना चाचणी करण्याचीही गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे.

लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाही त्यांच्या स्थितीनुसार घरी विलग होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. श्वास घेण्यास त्रास होत नसेल, ताप नसेल तसेच ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त असेल अशा रुग्णांनीच गृहविलगीकरणात राहावे, असा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.