सद्यःस्थितीत केळी पिकाच्या एकूण तीन बागा असून, त्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत आहेत. केळी पिकाचे व्यवस्थापन योग्य तर्हेने, विशेष काळजी घेऊन करावे.
- केळी बागांची सर्वसाधारण स्वच्छता राखावी. बाग तणमुक्त ठेवावी. मुख्य खोडाभोवती येणारी पिल्ले धारदार विळीने नियमित कापावी. केळीची हिरवी, पिवळी तसेच कोरडी पाने कापू नये. फक्त रोगट पाने किंवा पानांचा भाग कापून जाळून नष्ट करावा.
- मोठ्या बागेची टिचणी-बांधणी करावी. लहान बागेत कुळव चालवून माती भुसभुशीत करावी. वाफ्यातील तडे बुजले जातील, असे बघावे. यामुळे कमी तापमानामुळे मुळ्यांना होणारी इजा टाळली जाऊन, जमिनीत हवा ः पाणी गुणोत्तर योग्य राहते.
- लागवडीनंतर ७५ दिवसांनी नवीन कांदे बागेस प्रति झाड ८२ ग्रॅम युरियाची मात्रा द्यावी, तर मृगबागेस लागवडीनंतर २१० द्यावयाची प्रति झाड ४० ग्रॅम युरियाच्या मात्रेची सिद्धता करावी. खते वाफसा असताना द्यावीत. खते कोरून/कोली करून द्यावीत, झाकावीत.
- पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे. कापणीत असलेल्या कांदे बागेस प्रतिदिन, प्रतिझाड २५ ते ३० लिटर पाणी द्यावे. लहान कांदेबागेस ८ ते १० लिटर पाणी प्रतिदिन/झाड द्यावे. मृगबागेस १८ ते २० लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिन द्यावे. शिफारशीत पाणी मात्रा रोज द्यावी. या थंडीच्या काळात रात्रीच्या वेळेस किंवा भल्या पहाटे पाणी द्यावे. ठिबक सिंचन यंत्रणेची नियमित पाहणी करावी. नादुरुस्त असल्यास वेळेवर दुरुस्ती करावी.
- थंडी वाढल्यास, भल्या पहाटे बागेत ओला कचरा जाळून धूर करावा.
- कापणीयुक्त घडाची काढणी करावी. शक्यतो सकाळच्या वेळी केळीची कापणी करावी.
बागेभोवती सजीव कुंपण नसल्यास पळकाड्या, तुरकाड्या तसेच बाजरी/मका कडवी वापरून झापा तयार कराव्यात. अशा झापा बागेभोवती लावून बागेचे थंड वार्यापासून संरक्षण करावे.
अशा पद्धतीने केळी बागेची योग्य काळजी घेतल्यास कमी तापमानाचे विपरीत परिणाम होणार नाहीत.
– डॉ. सी. डी. बडगुजर
सहायक प्राध्यापक, केळी संशोधन केंद्र, जळगाव