शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत शासन शेतकऱ्यांच्या बाजूने

राज्यात कृषीपंपाच्या बिलाबाबत शासन नक्कीच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या वीजबिलाबाबत कृषीधोरण 2020 अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सदाशिव खोत यांनी वीज वितरण कंपनी कृषीपंपाची भरमसाठ बिले आकारत आहे. वीज गळती रोखणे व जेवढा वीजेचा वापर आहे तेवढेच बील वीज ग्राहकांना देण्यात यावीत, कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांची विद्युत जोडणी कापत असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत मांडली. या लक्षवेधीत सर्वश्री प्रविण दरेकर, गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, महावितरण कंपनीकडे खूप मोठ्या प्रमाणात वीज बिलांची थकबाकी आहे ही थकबाकी कमी व्हावी यासाठी राज्य शासन मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. कृषीपंप वीज धोरण २०२० अंतर्गत राज्यात ६६ हजार नवीन वीज कनेक्शन देण्यात आली आहेत. वीजगळती कमी करून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी वीज वितरण कंपनी देखील सदैव तत्पर आहे, अशी माहिती यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.