चटणी म्हणजे जेवणातही अविभाज्य भाग.कधी कधी नुसती चटणी पोळी देखील मस्त लागते. कोणताही पदार्थ असो छाटणीशिवाय अपूर्ण आहे. तोंडाला चव येण्यासाठी आणि आंबटगोड स्वादासाठी खास चटणीचे विविध प्रकार .
1 ) स्ट्रॉबेरी चटणी
साहित्य – ४०० ग्रॅम स्ट्रॉबेरी ,एक टेबलस्पून चिंचेचा कोळ , मीठ(चवीनुसार) अर्धा वाटी गूळ , एक टेबलस्पून तेल ,१५-२० लाल सुक्या मिरच्या , एक टेबलस्पून जिरे.
कृती- तेलावर मिरच्या परतून घ्याव्या नंतर ,स्ट्रॉबेरी, मिरच्या,मीठ,गूळ,चिंच, जिरे एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. २-३ मिनिटं हे मिश्रण उकळून घ्यावं.
2 ) कोथिंबीरची चटणी
साहित्य – २५० ग्रॅम कोथिंबीर ,थोडासा पुदीना ,१ कांदा ,३-४ पाकळी लसूण ,३ हिरवी मिरची ,१ तुकडा आलं , 1 छोटी चिंच, थोडा गूळ, १ चमचा शेंगदाणा , मीठ चवीप्रमाणे.
कृती- कोथिंबीर व पुदीना निवडून स्वच्छ धुवून घ्या. कांदा, लसूण व आलं चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या. शेंगदाणे भाजून सोलून घ्या. हे सगळे साहित्य मिक्सरमधून काढा. त्याचं वाटण म्हणजेच कोथिंबिरीची चटणी .
3 ) लसणाची चटणी-
साहित्य – २५० ग्रॅम टॉमेटो , २ पूर्ण लसूण, अर्धा टीस्पून जिरे , १ टीस्पून मीठ ,२ टीस्पून धणे पावडर, १ टीस्पून लाल तिखट , २ टीस्पून तूप.
कृती- टॉमेटोचे बारीक तुकडे करा. टोमॅटो आणि लसूण मिक्सरमधून वाटून घ्या. एका भांड्यात तूप गरम करून जिऱ्याची फोडणी द्या.दुसऱ्या बाजूला जिरे भाजून त्यात धणे पावडर, लाल तिखट, मीठ व बारीक केलेला टोमॅटो-लसूण टाका. थोडा वेळ शिजवा. शिजवताना ते मिश्रण हलवत राहा. चटणी घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. गार झाल्यावर वाढा.
4 ) खजुराची चटणी-
साहित्य- ५-६ खजुर ,३ हिरव्या मिरच्या, ४ टीस्पून कोथिंबीर, २ चिमूट हिंग , छोटी चिंच , अर्धा चमचा मीठ , २ चमचे तेल, पाव चमचा मोहरी.
कृती- थोड्या पाण्यात खजुर, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चिंच आणि मीठ हे मिश्रण एकजीव करावे . त्यानंतर फोडणी करावी आणि ती या मिश्रणात ओतावी. गरजेनुसार पाणी घालावे.
5 ) नारळाची चटणी-
साहित्य – १ कप ताजा खवलेला नारळ, पाव कप चण्याची डाळ , चवीपुरते मीठ, पाव टिस्पून साखर , १ हिरवी मिरची, फोडणीसाठी अर्धा टिस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, अर्धा टिस्पून उडीद डाळ, १/८ टिस्पून हिंग, ५ ते ७ कढीपत्ता पाने , १ सुकी लाल मिरची , १/८ आले पेस्ट
कृती – नारळ, डाळं, हिरवी मिरची, मीठ आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात गरजेपुरते पाणी घालून एकजीव करा . नंतर तेल गरम करून त्यात मोहोरी आणि उडीद डाळ घाला. उडीद डाळ लालसर झाली की हिंग, कढीपत्ता, लाल मिरची आणि आलंपेस्ट घालून फोडणी करून घ्या. हे मिश्रण नारळाच्या मिश्रणावर घाला. मिश्रण एकजीव करा . ही चटणी इडली, मेदू वडा, मसाला डोसा, उत्तपा, आप्पे आणि इतर दाक्षिणात्य पदार्थांबरोबर छान लागते.