कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसाला 50 हजार देणार

2019 च्या सुरुवातीच्या संपूर्ण काळात वृत्तपत्रांचे, न्यूज चॅनलचे, समाजमाध्यमांचे ठळक मथळे हे कोरोना महामारीच्या विविध दाखल्यांनी झळकत होते. कोरोनासारख्या महामारीने झपाटयाने संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीत घेतले होते. आपल्या देशात मजूर, कामगार, लघूउद्योजक यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. याच गरीब वर्गाला कोरोनाची झळ सर्वाधिक सोसावी लागली.

याचा परिणाम देशाच्या अर्थ व्यवस्थेवर झाला. यावेळी प्रत्येकाला ‘सुरक्षा कवच व सुरक्षेची हमी’ हवी होती. अशा कठीण काळात महाराष्ट्र शासनाने सर्व मार्गाने अभूतपूर्व लढा दिला. आणि हा लढा देशासाठी आदर्श ठरला. कोरोनाची दुसरी लाट देखील तीव्र होती. यावेळी ऑक्सीजन, रेमडेसीवीर आणि वैद्यकीय मनुष्यबळाची तमा न बाळगता अशा संकटातही महाराष्ट्राने संयमाने आणि धीराने कोविड विरोधात लढा दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील गोरगरिब जनतेला शासनाच्या निर्बंधांचा फटका बसू नये यासाठी 5 हजार 400 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.

शिवभोजन थाळी मोफत देण्याच्या निर्णयामुळे लाखो गरजूंना अशा कठीण काळात पोटभर अन्य मिळाले. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात शासनाच्या हातात संसाधने नव्हती, सोयी नव्हत्या, उपकरणे नव्हती, मात्र आता बऱ्याच साधनसामुग्रींची उपलब्धता करून घेणे शक्य झाले आहे. कोविड केअर सेंटर, बेडस्, आयसीयू सुविधा, व्हेंटिलेटर्स, औषधे, मास्क, ऑक्सीजन उपकरणे अशा अनेक बाबी आज सर्वांसाठी शासनाने माफक दरात उपलब्ध दिल्या आहेत. राज्यासह देश प्राणवायूसाठी धडपडत असतांना राज्याने तातडीने मिशन ऑक्सीजन सुरु करून दररोज 1 हजार 270 मे.टन ऑक्सीजन निर्मितीसह 3 हजार मे.टन ऑक्सीजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आणि कोविडची लढाई जोमाने लढत तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी शासन सज्ज झाले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे, तर राज्यातील नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याच्या कामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर राहीला. “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेत महाराष्ट्र माझे कुटूंब आहे, कुटूंबातील प्रत्येक सदस्याचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हीच भावना मनात ठेवून मुख्यमंत्र्यांपासून गावोगावच्या ग्रामपचांयत सदस्यांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कोरोना विरुध्दच्या लढ्यात योगदान दिले. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, फार्मासिस, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अंगणवाडीताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी/कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांनी जीवाची जोखीम पत्करून कोरोना विरुध्द लढा दिला. आणि या संकटात एकजूट होऊन इतिहास घडविला. कोरोना विरुध्द लढतांना यातीलच काही सहकाऱ्यांना, नागरिकांना प्राण गमवावे लागले. यासाठी शासनाने काही पथदर्शी महत्त्वाचे निर्णय घेतले आाहेत.

मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद  निधीमधून कोविड-19 या आाजाराने निधन पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जी व्यक्ती कोविड-19 आजारामुळे निधन पावली आहे. तसेच जरी त्या व्यक्तीने कोविड-19 चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल, तरी त्या मृत व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकाला 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद  निधीमधून देण्यात येणार आहे. ही मदत मिळण्यासाठी कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकांनी राज्य शासनाने या करीता विकसित केलेल्या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्जदार स्वत: https://t.co/n1DLkgkndA या लिंकवर क्लिक करून किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करू शकतो. हा अर्ज दाखल करतांना अर्जदाराने पुढीलप्रमाणे कागदपत्रे व माहिती सादर करणे बंधनकारक राहील. १) अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक २) अर्जदाराचा स्वत: चा बँक तपशील ३) मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील  ४) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र ५) इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र या बाबींची पुर्तता करणे आवश्यक राहील. या वेबपोर्टलवर आॉनलाईन अर्ज कसा करावा, तसेच संपूर्ण योजनेची कार्यपध्दतीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे, तालुका व गावपातळीवरील शासकीय यंत्रणा यांना या पोर्टलबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

अधिक माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202111261612210519…..pdf या लिंकवर क्लिक करून शासन निर्णय पहावा.

लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लायार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची/मदतीची रक्कम थेट जमा करण्याचे प्रयोजन शासनाने केले आहे. ज्या मृत व्यक्तींचे RT-PCR/Molecular Tests/RAT या चाचण्यांमधून Positive अहवाल आले असतील अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे Clinical diagnosis कोविड-19 असे झाले होते, याच व्यक्तीचे प्रकरण कोव्हिड-19 मृत्यू प्रकरणासाठी कोव्हिड प्रकरण म्हणून समजण्यात येईल.

मृत व्यक्तीचा मृत्यू चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा  रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत झाला असेल तरच हा मृत्यू कोविड-19 मुळे झाला असे समजण्यात येईल.  वर नमुद शासनाच्या शासन निर्णयातील अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या प्रकरणांना रुपये 50 हजार सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यात येईल. याकरीता शासनाने 2021-2022 या आर्थिक वर्षात 700 कोटी रुपयांच्या निधीचे प्रयोजन केले आहे. कोरोनाच्या लढाईत अनेक कोरोना योध्दांना, नागरिकांना आपला जीव गमवावा लागला हे वेदनादायी आहे. राज्य शासन त्यांच्या कुटूंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. असा विश्वास शासनाने नेहमीच नागरिकांना दिला आहे. त्यामुळे जनतेचा आत्मविश्वास वाढला आहे. कोरोना आटोक्यात यावा यासाठी शासन रोज नवनवीन प्रयोग करून देशासमोर आदर्श ठेवत आहे. नुकतचे पालघर सारख्या आदिवासी बहुल जिल्हयातील दुर्गम भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनद्वारे कोरोना लस पुरविण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला. हे विशेष होय

प्रविण डोंगरदिवे, माहिती सहायक, विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई