मोसंबीवरील आरोह (डायबॅक) रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

मोसंबी हे मराठवाडयातील महत्वाचे फळपीक आहे, परंतु आरोह (डायबॅक) या रोगामुळे अपरिमित नुकसान होत आहे. या रोगाबददल असा समज होता की, हा रोग फक्त विषाणु (व्हायरस) मुळे होतो. परंतु सखोल संशोधन केले असता, या रोगाची नेमकी कारणे शोधण्यात यश आले असुन हा रोग पुर्णपणे नियंत्रण होतो हे देखील सिध्द करण्यात आले आहे.

आरोह (डायबॅक) रोगाची कारणे

१. अयोग्य जमिनीची निवड : या पिकास हलकी, मध्यम व चुनखडी विरहीत जमिनीची आवश्यकता असते, परंतु अभ्यासाअंती असे दिसुन आले की, बहुतेक ठिकाणी मोसंबीची लागवड ही अतिभारी, चुनखडीयुक्त किंवा क्षारयुक्त जमिनीत झालेली आहे. वेगवेगळया नदीच्या, ओढयाच्या काठावरील काळया किंवा पोयटयाच्या जमिनीत ही लागवड आहे व अशा जमिनीत माती व पाण्याव्दारे वाढणा-या बुरशीची देखील वाढ झपाटयाने होते. सारांशाने अयोग्य अशा जमिनीतील लागवड या रोगास कारणीभुत आहे.

२. पाण्याचा अयोग्य वापर : पुर्वी पाणी हे मोटेव्दारे मर्यादित प्रमाणात दिले जात असे. अलीकडे मात्रा इलेक्ट्रीक मोटारव्दारे अमर्याद पाणी अयोग्य पध्दतीने दिले जाते. झाडाचा बुंधा सतत पाण्याच्या संपर्कात राहिल्याने फायटोफ्थेरा नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार फार झपाटयाने आणि मोठया प्रमाणावर होतो, एका रोगट झाडापासुन अनेक झाडास रोग लागण्यास पाणीसंपर्क कारणीभुत ठरतो. त्याचप्रमाणे अती पाण्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील क्षार वर येतात व जमिनीत हवा खेळती न राहिल्यामुळे जमिनीत कर्ब नत्राचे प्रमाण देखील समतोल राहत नाही. पर्यायाने जमिनीचा सामु हा विम्लतेकडे झुकतो. त्यामुळे सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता होऊन झाडावर त्याची विपरीत लक्षणे दिसु लागतात. झाड कमजोर होऊन वेगवेगळया रोगांना सहज बळी पडते.

३. अशास्त्रीय आंतरमशागत : यामध्ये लोखंडी नांगर, किंवा ट्रॅक्टर व्दारे खोल व अगदी झाडाच्या बुंध्यापर्यंत नांगरणी, वखरणी, मोडगणी करीत असतांना झाडाच्या मुख्य मुळयांना जखमा होणे, दुय्यम मुळया तुटणे किंवा उपसुन बाहेर येणे, ब-याच वेळा झाड फाटणे, अथवा मुख्य मुळया फाटाळणे किंवा तुटणे असे प्रकार घडतात आणि त्यामधुन जमिनीव्दारे पसरणा-या रोग – जंतुचा शिरकाव होऊन झाडे रोगग्रस्त होतात.

४. सेंद्रीय खताचा अभाव व असेंद्रीय खतांचा वापर : शेणखत किंवा सेंद्रिय खताऐवजी आता सरळ असेंद्रीय खताचा वापर करतात की, ज्यामध्ये प्रामुख्याने युरिया किंवा मिश्र खतांचाच भर असतो. त्यामुळे काही अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो तर काही अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढुन झाडातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व झाड झपाटयाने रोगास बळी पडते.

५. पीक संरक्षणाचा अभाव : इतर पिकांप्रमाणे मोसंबीवर कुठल्याच पीक संरक्षण उपायाचा वापर केला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रोग / कीडग्रस्त बागांवर रोग / कीडीची तीव्रता सतत वाढत जाऊन झाडावर १० ते ८० टक्क्यापर्यंत डायबॅकची तीव्रता क्रमाक्रमाने वाढुन काही दिवस झाड टिकते व नंतर पुर्णपणे वाळते.

६. रोपांची निवड : रोगमुक्त मातृवृक्षापासुन रंगपुर खुंटावर तयार केलेली रोपे निवडावीत.

वरील सहा प्रमुख कारणांव्यतिरिक्त इतर कारणे देखील आहेत, त्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो.

–        –  अयोग्य रोपांची निवड

–       – बहार धरते वेळेस पाण्याचा अवाजवी जास्तीचा ताण

–       – एका वेळेस दोन किंवा तीन बहारांची फळे धरणे

–       – फळधारणेच्या काळात पाण्याचा अभाव असणे

–       – जमीनीच्या मगदुराप्रमाणे किंवा झाडाच्या गरजेनुसार पाणी न देणे

–       – आजारी झाडावर आवश्यकतेपेक्षा जास्त फळे धरणे

–       – अपुरा खताचा पुरवठा

–      –   सुक्ष्म अन्नद्रव्याचा अभाव

–       – सुत्रकृमीचा प्रादुर्भाव

–       –  रोग किडीपासुन वेळीच नियंत्रण न करणे

रोगग्रस्त बागांचे व्यवस्थापन  

शेतक-यांनी आपली बाग रोगग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. परंतु जर बागेत आरोहाचा प्रादुर्भाव झालाच तर खालीलप्रमाणे उपाय योजना घ्यावी.

१.   भारी व पाणी साचुन ठेवणा-या जमीनीत एक फुट रुंद व दीड ते दोन फुट खोल चर उताराच्या दिशेने खोटुन पाण्याचा निचरा करावा.

२.   प्रत्येक झाडास बांगडी (रिंग) पध्दतीने किंवा ठिबक सिंचनाव्दारेच मर्यादित पाणीपुरवठा करावा. ८ ते १० वर्षे वयाच्या झाडावर ८० ते १०० लि. पाणी प्रति दिवशी दयावे.

३. बागेस नियमित देणा-या खताच्या मात्रा हया सेंद्रिय खतामधुनच द्याव्यात. उदा. शेणखत, रैलीमाल (७:१०:५) स्टोरामील, ब्ल्डमील, मासळी खत, निंबोळी पेंड, शेंगदाणा पेंड इत्यादी मधुनच दयावे. प्रति झाड ८०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद व ४०० ग्रॅम पालाश मिळेल अशा प्रमाणात द्याव्यात.

४.  असेंद्रिय खतामध्ये अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट अशा गंधकयुक्त खताचा वापर करावा.

५.   आंतरमशागत झाडाच्या मुळयांना जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी, तसेच झाडाच्या घेराखाली व मुख्य खोडापासुन दुर आंतरमशागत करावी. तसेच खत व पाण्याचा वापरही खोड, बुंधा / मुळयांपासुन दुरच करावा.

६.    मोसंबीवर एका वर्षात एकाच बहाराची निवड करावी तोच बहार नियमित घ्यावा.

७.    झाडावर जास्तीत जास्त ५०० ते ६०० एवढीच फळे घ्यावी.

८. रोगग्रस्त बागांना जास्त ताण देवु नये. साधारणत: हलक्या जमिनीत १५ दिवस, मध्यम जमीनीत २१ दिवस व भारी जमीनीत ३० दिवस पाणी सोडावे व ताण तोडताना २५ टक्के, ५० टक्के व शेवटी १०० टक्के पाणी तीन ते चार दिवसांच्या अंतराने देऊन ताण मोडावा. रोगट झाडावरील सर्व फळे तोडुन टाकुन झाड निरोगी होईपर्यंत त्याच्या कायिक वाढीवर भर देणे आवश्यक आहे.

९.    बागेवरील फळाची विक्री व्यापा-यांना वायदे पध्दतीने करु नये.

 .   झाडावर फळे असतांना बागेस पाण्याचा ताण पडू देऊ नये.

पीक संरक्षण :

व्यवस्थापनाबरोबरच पीक संरक्षण उपाययोजना करणे सुध्दा महत्वाचे आहे, त्यासाठी खालील उपाय योजावेत.

१.   खोडावर जर डिंक असेल तर तो रोगग्रस्त भाग एक इंच निरोगी भागासह खरडुन काढावा. हा खरडलेला भाग एक ग्रॅम मरक्युरिक क्लोराईड १ लिटर पाण्यात मिसळुन धुवून काढावा.

२. प्रत्येक झाडास वर्षातुन दोन वेळेस (पावसाळयापुर्वी व पावसाळयानंतर) २५ ग्रॅम कॉपरऑक्सीक्लोराईड १० लि. पाण्यात मिसळुन प्रत्येक झाडाच्या खोडावर ओतावे.

३.     रोगट झाडावर शक्यतो २७ ग्रॅम मेटालेक्झील १० लि. पाण्यात मिसळावे. त्यात चिकटण्यासाठी सँडोव्हीट नावाचे औषध मिसळावे. नंतर तयार झालेला बोर्डोपेस्ट प्रत्येक झाडाच्या खोडावर एक मीटर उंचीपर्यंत लावावा.

४.  आपल्या जमिनीत सुत्रकृमी (निमॅटोड) असल्यास फ्युराडॉन नावाचे औषध प्रति झाडास १०० ग्रॅम जमिनीतुन द्यावे.

५. बागेस सर्वसाधारण वर्षातुन तीन वेळेस नवीन पालवी येते. तेव्हा वर्षातुन तीन वेळेस अंतरप्रवाही कीटकनाशक, बुरशीनाशक व सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारण्या घ्याव्यात.

खालीलप्रमाणे फवारणी पत्रक पाळावे :

१.   पहिली फवारणी (जानेवारी – फेब्रुवारी) – मोनोक्रोटोफॉस ११९ मि. ली + कार्बेन्डॅझिम १०० ग्रॅम, १०० लि. पाण्यात मिसळुन घ्यावी.

२. दुसरी फवारणी (जुन – जुलै) – डायथेन एम ४५, २५० ग्रॅम १०० लि. पाण्यात मिसळुन फवारावे.

३.  तिसरी फवारणी (सप्टेंबर – ऑक्टोबर) – ३०० मि. लि. + कार्बेन्डॅझिम १०० ग्रॅम १०० लि. पाण्यात मिसळुन घ्यावी.

४. स्ट्रेप्टोसायक्लीन ५०० पीपीएम वरील प्रत्येक फवारणी नंतर स्वतंत्र फवारावे. वरील फवारण्यामध्ये जर रोग कीडीचे नियंत्रण नाही झाले तर रोग कीडीचे निदान करुन वरीलपैकी कोणतीही फवारणी आलटुन पालटुन घ्यावी.

५.  प्रत्येक पाले वाढीच्या (Flush) च्या काळात सुक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्यामध्ये ट्रायसेल किंवा मिकनेल्फ–३२ किंवा इतर कोणतेही सुक्ष्म अन्नद्रव्यापैकी ४०० ग्रॅम १०० लि. पाण्यात मिसळुन झाडावर फवारणी घ्यावी.

६.  खोडावर येणा-या साल खाणा-या अळीची दर तीन महिन्यांनी पाहणी करुन मोनोक्रोटोफॉस किंवा एंडोसल्फान कुपीत भरुन छिद्रात सोडावे व छिद्र बंद करावे.

टिप : अधिक माहितीसाठी वनामकृविच्‍या मोसंबी संशोधन केंद्र, बदनापुर येथे संपर्क साधावा . दुरध्‍वनी क्रमांक 02482 – 261766