कृषिविषयक स्टार्ट-अप्स मध्ये महिलांचा सहभाग

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय कृषी विकास योजने’अंतर्गत (RKVY-RAFTAAR) 2018-19 मध्ये “अभिनव संशोधन आणि कृषी उद्योजकता विकास” या घटक उपक्रमाची सुरुवात केली.

आर्थिक पाठबळ पुरवून आणि उपयुक्त परिसंस्था जोपासून अभिनव संशोधन तसेच कृषी क्षेत्रातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची  सुरुवात करण्यात आली आहे. “अभिनव संशोधन आणि कृषी उद्योजकता विकास” कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 173 महिला संचालित स्टार्ट-अप्स आणि उद्योगांना पाठबळ पुरविण्यात आले आहे.

तसेच 50 कृषी उद्योग जोपासना केंद्रांची स्थापना करण्यात आली असून ही केंद्रे एनएआयएफ योजनेखाली भारतीय कृषी संशोधन मंडळाच्या जाळ्याअंतर्गत कार्यान्वित करण्यात आली आहेत. सक्षम महिला स्टार्ट-अप संचालिका आणि उद्योजिका या कार्यक्रमांचा लाभ घेऊ शकतात.

प्रगत महिला शेतकरी आणि कृषी उद्योजिकांच्या यशोगाथांना इलेक्ट्रॉनिक, मुद्रित आणि समाज माध्यमांमधून तसेच चर्चासत्रांच्या आयोजनातून प्रसिद्धी देण्यात येत आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.