श्रीराम म्हणजे देशाच्या विविधतेतील एकतेचा समान धागा : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत ‘श्री राम जन्मभूमी मंदिरा’चे भूमीपूजन केले.
भारतासाठी एक गौरवशाली अध्याय
याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी या मंगलक्षणी देशातील नागरिकांचे आणि जगभरातील रामभक्तांचे अभिनंदन केले. आजच्या घटनेला ऐतिहासिक असे संबोधत ते म्हणाले, भारतासाठी आज एका गौरवशाली अध्यायाची सुरुवात होत आहे, देशभरातील लोकांनी ज्याची शतकानुशतके प्रतीक्षा केली होती, त्या क्षणासाठी लोक उत्साही आणि भावनिक झाले आहेत, काहीजणांना तर हा क्षण आपल्या कारकिर्दीत पाहता आला, यावर क्षणभर विश्वास बसत नसेल. त्यांनी अधोरेखीत केले की, राम जन्मभूमी पुन्हा तुटण्याच्या आणि पुन्हा उभारण्याच्या चक्रातून मुक्त झाली आहे आणि आता मंडपाच्या जागी रामललाचे भव्य मंदिर उभारले जाईल.
पंतप्रधान म्हणाले, 15 ऑगस्ट हा दिवस ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी देशभरातील लोकांनी केलेल्या त्यागाचे प्रतिनिधीत्व आहे, त्याचप्रमाणे हा दिवस राम मंदिरासाठी पिढ्यानपिढ्यांच्या प्रचंड समर्पणाचे आणि अखंड संघर्षाचे प्रतीक आहे. राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला त्या सर्वांचे पंतप्रधानांनी स्मरण केले आणि त्यांना अभिवादन केले.
PM @narendramodi laid the foundation stone for construction of most awaited Ram Mandir in Ayodhya.
Telegram : https://t.co/OWwRwSyu3X pic.twitter.com/yfQnr922R5
— Prasar Bharati News Services (@PBNS_India) August 5, 2020
श्रीराम – आपल्या संस्कृतीचा पाया
पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे अस्तित्व नाकारण्याचे अनेक प्रयत्न केले जात असतानाही श्रीराम हे आपल्या संस्कृतीचा पाया आहेत. ते म्हणाले की, राममंदिर हे आपली संस्कृती, शाश्वत विश्वास, राष्ट्रीय भावना आणि सामुहिक इच्छाशक्तीचे आधुनिक प्रतीक आहे आणि आगामी पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरेल. मंदिर उभारणीच्या कामामुळे विविध क्षेत्रांत अनेक संधी निर्माण होतील आणि प्रदेशाची अर्थव्यवस्था बदलेल.
पंतप्रधान म्हणाले, हा दिवस कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धा आणि निग्रहाची साक्ष देतो. गेल्या वर्षी माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेंव्हा एकमेकांच्या भावना समजून घेऊन देशातील नागरिकांनी निकालाला प्रतिसाद दिला त्या सन्मान आणि संयमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि आजही तोच सन्मान आणि संयम दिसून येत असल्याचे म्हटले. श्रीरामाचा विजय, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलणे, छत्रपती शिवाजींनी स्वराज्याची स्थापना करणे, गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणे यासारख्या अनेक कार्यांमध्ये गरीब, मागासवर्गीय, दलित, आदिवासींसह सर्व स्तरातील लोकांनी कसा हातभार लावला याचे पंतप्रधानांनी स्मरण केले, त्याच पद्धतीने सामान्य नागरिकांच्या सहकार्याने आणि योगदानाने राममंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे, असे ते म्हणाले.
श्रीराम यांच्या चारित्राचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी नेहमी सत्याची बाजू घेतली, सामाजिक समरसता आपल्या राजवटीची कोनशिला म्हणून स्थापित केली. त्यांचे संपूर्ण प्रजेवर तितकेच प्रेम होते, पण गोरगरीब आणि गरजू लोकांप्रती त्यांची विशेष आस्था होती. जीवनाचा असा कोणताही पैलू नाही जिथे श्रीराम प्रेरणादायी ठरत नाहीत, त्यांचा प्रभाव देशाची संस्कृती, तत्वज्ञान, श्रद्धा आणि परंपरा या सर्व बाबींमध्ये दिसून येतो.
श्री राम – विविधतेतील एकतेचा समान धागा
प्राचीन काळात वाल्मिकी रामायणातून, तर मध्ययुगीन काळात तुलसीदास, कबीर आणि गुरु नानक यांच्या माध्यमातून श्रीराम मार्गदर्शनाचा प्रमुख स्रोत ठरले आहेत आणि अहिंसा व सत्याग्रहाचे उर्जा स्त्रोत म्हणून महात्मा गांधींच्या भजनांमध्ये देखील श्रीराम होते, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बुद्ध सुद्धा श्रीरामांशी संबंधित आहेत, आणि शतकानुशतके अयोध्या शहर हे जैन धर्माचे श्रद्धास्थान आहे, असे ते म्हणाले. विविध भाषांमध्ये लिहिलेल्या वेगवेगळ्या रामायणांविषयी बोलताना श्रीराम म्हणजे देशातील विविधतेतील एकतेचा समान धागा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
श्रीराम अनेक देशांमध्ये पूजनीय आहेत असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. जास्तीत जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेले देश, इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, नेपाळ, अशा देशांमध्येही रामायण लोकप्रिय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. श्रीरामांचा संदर्भ इराण आणि चीनमध्येही आढळतो आणि राम कथा अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत, असेही त्यांनी नमूद केले. राममंदिराचे बांधकाम सुरू झाल्यामुळे आज या सर्व देशातील लोकांना नक्कीच आनंद झाला असेल असेही पंतप्रधान म्हणाले.
संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणा
येणाऱ्या काळासाठी हे मंदिर संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणा ठरेल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. श्री राम, राम मंदिर आणि आपल्या जुन्या परंपरेचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे असेही पंतप्रधानांनी नमूद केले. हे लक्षात घेऊनच राम मंदिराची उभारणी करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
राम राज्य
महात्मा गांधींजींचे स्वप्न असलेल्या रामराज्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. श्री राम यांची शिकवण देशाला सतत मार्गदर्शन करत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. कोणी गरीब किंवा दु: खी राहु नये; पुरुषांप्रमाणेच स्त्रिया देखील तितक्याच आनंदी असल्या पाहिजेत; शेतकरी आणि पशुपालक नेहमी आनंदी राहावे; वृद्ध, लहान मुले आणि डॉक्टर यांचे नेहमीच रक्षण केले पाहिजे; आश्रय शोधणाऱ्यांचे संरक्षण करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे; स्वर्गापेक्षा जन्मभूमी श्रेष्ठ आहे; एखाद्या राष्ट्रात जितकी जास्त शक्ती असते तितकीच शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता अधिक, अशी श्री रामांची शिकवण आहे. श्रीरामांच्या या आदर्शांचे अनुसरण करून देश प्रगती करत आहे.
परस्पर प्रेम आणि बंधुतेचा पाया
परस्पर प्रेम आणि बंधुता या आधारावर मंदिर बांधले जावे यावर पंतप्रधानांनी भर दिला. ‘सबका साथ’ आणि ‘सबका विश्वास’ च्या सहाय्याने आपल्याला ‘सबका विकास’ साध्य करून आत्मनिर्भर भारत बनविण्याची गरज आहे असेही पंतप्रधानांनी नमूद केले. कुठलाही विलंब न करता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिले पाहिजे हा श्रीरामांचा संदेश अधोरेखित करत देशाने या संदेशाचे पालन करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.
कोविड काळात ‘मर्यादा‘
कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामांच्या ‘मर्यादा’ मार्गाचे महत्त्व पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. सद्यपरिस्थितीत सर्वांनी ‘दो गज की दूरी – मास्क है जरूरी’ या मर्यादांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले.