मिस इंडिया युनिव्हर्स २०२१ चा किताब जिंकला आहे, चंदीगढच्या २१ वर्षीय हरनाज संधू हिने! पण तुम्हाला माहितीय, एकेकाळी ती इतकी बारीक होती की, तिच्यामध्ये तिच्या कमी वजनामुळे न्यूनगंड निर्माण झाला होता. त्यामुळे तिच्या मनावर दडपणही येत असे. तु्म्हाला सतत कोणी तुमच्या अति कमी किंवा खूपच जास्त वजनाबद्दल टोकले तर कसे वाटेल? तसेच हरनाजला वाटायचे.
अतिशय सुंदर असलेली हरनाज आता मिस युनिव्हर्स २०२१ या विश्वसुंदरी स्पर्धेसाठी खूप चांगली तयारी करते आहे. भरपूर परिश्रम घेते आहे. तिला या स्पर्धेत तिरंगा सन्मानाने फडकवायचा आहे. तिच्या या वाटचालीत तिला तिच्या आईचे चांगले पाठबळ आहे. तिने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. संघर्ष, परिश्रम आणि सकारात्मकता या मानवी आयुष्यातील अपरिहार्य गोष्टी असल्याचे ती समजते. तिने प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मकतेच्या जोरावरच स्वतःतील न्यूनगंडाला बाजूला सारले आणि योग्य आहार, व्यायाम आणि कष्ट यावर भर दिला आहे.
ती म्हणते की, हल्ली स्पर्धेच्या काळात माणसाला ताणतणावांचा सामना करावा लागतो. त्यावेळी नकारात्मकता हा त्याचा स्वभाव होतो. तो स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊन आत्मविश्वास हरवून बसतो. तोच यशाच्या मार्गातील अडथळा ठरू शकतो. अशावेळी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला वेळीच स्वतःला सावरता यायला हवे. त्यावेळी ताणतणावातून बाहेर येण्यासाठी, तुम्ही तुमच्या आयुष्यातील फक्त एका व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवणे आवश्यक आहे, ज्याच्याशी तुम्ही कोणतीही संकोच न करता सर्व समस्या शेअर करू शकता. तीच व्यक्ती तुम्हाला पुढे जाण्यास निश्चित मदत करते.
हरनाजला मॉडेलिंगबरोबरच पोहणे, घोडेस्वारी, अभिनय आणि नृत्याची आवड आहे. ती सध्या उच्चशिक्षण घेत असून तिला अभिनयाचीही आहे. त्यामुळे भविष्यात तिला कधी संधी मिळाली तर तिला नक्कीच चित्रपटात काम करायला आवडेल. तिने दोन दोन पंजाबी चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे.