प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात दिनांक 12 डिसेंबर वगळता वातावरण ढगाळ राहून पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात किमान तापमानात किंचीत घट होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा बागायती गहू पिकाची पेरणी केली नसल्यास पेरणी 15 डिसेंबरहपूर्वी करून घ्यावी. उशीरा बागायती गहू पिकाच्या पेरणीसाठी निफाड-34, पीबीएन-142 (कैलास), एचडी-2501, एचडी-2833 या वाणांची निवड करावी. उशीरा बागायती गहू पिकाच्या पेरणीसाठी 80:40:40 किलो नत्र, स्फुरद व पालाश खताची शिफारस आहे त्यापैकी पेरणी वेळी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश खत मात्रा द्यावी. रब्बी भुईमूग पिकात मावा, फुलकिडे व तूडतूडे यांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकावर पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
लिंबूवर्गीय फळ पिकांत काळी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
कोबी वर्गीय भाजीपाला पिकात पानावरील बूर्शीजन्य ठिपके रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 1.0 ते 1.5 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. पूर्नलागवड केलेल्या फुलपिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
चारा पिके
रब्बी हंगामासाठी लागवड केलेल्या चारा पिकांत तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
तुती रेशीम उद्योग
उझी माशीचा संगोपन गृहात प्रादूर्भाव होऊ नये म्हणून संगोपन गृह चोही बाजूने, वरील पत्रे व शेडनेट सील करावे. सर्व प्रथम तुती फांद्या कापून शेतातून सरळ संगोपन गृहात आणण्याचे बंद करावे. पाने साठवण्यासाठी अंधार खोलीची व्यवस्था करावी तेथे फांद्या उभ्या ठेवून पानावरची धूळ स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा फवारा किंवा फॉगर ची व्यवस्था करावी. अंधार खोली तसेच संगोपनगृहातील फवारणी केलेले दूषित पाणी बाहेर निघून जाण्यासाठी चोही बाजूने 22.5 सेंमी X 15 सेंमी रूंदीच्या नालीची व्यवस्था असावी. 100% निर्जंतूकीकरण होण्यासाठी दोन कोषाच्या पिकात 8 दिवसाचे अंतर ठेवणे व त्या काळात 3 ते 4 वेळा आलटून पालटून ब्लिचिंग पावडर 0.2% 200 ग्राम +30 ग्राम चुना पावडर पाण्यासोबत मिश्रण करून फवारणी करावी. नंतर अस्त्र निर्जंतूक 50 ग्राम + 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सामुदायिक विज्ञान
दूधामधील कॅल्शियम हाडांसाठी तर प्रथिने हे स्नायूंच्या बळकटी करणाकरिता आवश्यक आहे. सकाळी दुध घेतल्यानंतर दिवसभर ताजे वाटते. दुधामध्ये झींक आणि विटामीन डी असल्यामूळे दुधास रोग प्रतिकार शक्ती वाढवीणारे अन्न असे समजले जाते.
(सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)