जनावरांचा विमा काढलाय? अशी आहे योजना

शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे दोन स्रोत असतात, एक शेती करतो आणि पशुपालन. तो गाय, म्हशीचे दूध विकतो आणि बैलांच्या मदतीने शेत नांगरून शेती करतो. शेतकऱ्यासाठी पीक आणि प्राणी या दोघांसाठीही काळजीचे कारण असते. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची नासाडी होते, त्याचप्रमाणे जनावरेही रोग, हवामान किंवा अपघाताला बळी पडतात. अनेक शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा काढतात पण जनावरांचा विमा काढायला विसरतात, ज्याची किंमत हजारांत असते, गाय किंवा म्हैस दुभती असेल तर त्याची किंमतही लाखांत असते. अशा स्थितीत शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पशुधन विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत नोंदणीकृत शेतकरी बांधवांची जनावरे दगावल्यास त्यांना त्यांची भरपाई दिली जाते जेणेकरून नुकसान भरून काढता येईल. पशुधन विमा योजना काय आहे आणि त्याचे फायदे कसे मिळवायचे ते जाणून घ्या –

पशुधन विमा योजना काय आहे
या योजनेत, सरकार शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी विम्यामध्ये जमा केलेल्या प्रीमियमच्या 50 टक्के रक्कम भरते. या योजनेंतर्गत, देशी/संकरीत दुभत्या जनावरांचा त्यांच्या बाजार मूल्यावर विमा उतरवला जातो. प्रीमियमची रक्कम राज्यानुसार बदलते. एखाद्या राज्यात केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून ही रक्कम भरतात.

विमा कसा काढतात
१. ज्या शेतकरी बांधवांना त्यांच्या जनावरांचा विमा काढायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या जवळच्या पशु रुग्णालयात विम्याची माहिती द्यावी.
२. त्यानंतर पशुवैद्यक व विमा एजंट शेतकऱ्याच्या घरी येऊन जनावरांच्या आरोग्याची तपासणी करतील.
३. तपासणी केल्यानंतर, पशुवैद्य आरोग्य प्रमाणपत्र जारी करतात.
४. तपासणीनंतर विमा एजंट जनावराच्या कानात एक टॅग लावतो, ज्यावरून जनावराचा विमा उतरल्याचे दिसून येते.
५. त्यानंतर शेतकरी आणि जनावराचा एकत्र फोटो काढला जातो.
६. त्यानंतर विमा पॉलिसी जारी केली जाते.
७. जनावराचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला कळवावे लागते.
८. टॅग निघाला किंवा हरवल्यास, विमा कंपनीला कळवावे लागेल जेणेकरून नवीन टॅग बसवता येईल.