दीपक श्रीवास्तव : निफाड
निफाड तालुक्यात तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पीक वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची धडपड सुरू असतांनाच जवळपास छत्तीस तासांहून अधिक काळपर्यंत चाललेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी मोठया संकटात सापडला आहे.
अजूनही दोन तीन दिवस असेच वातावरण टिकून राहण्याची माहिती असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना बसला आहे. सतत पडणारा पाऊस कडाक्याची थंडी, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि रोगट हवामान यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाऊन द्राक्षांच्या घडांचे मोठे नुकसान होणार आहे.
ऑक्टोबर छाटणी पासून आत्तापर्यंत द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षबागेवर प्रचंड खर्च केलेला आहे हा संपूर्ण खर्च या दोनच दिवसात पूर्णपणे पाण्यात गेला आहे. अवकाळी पावसाने पिकाचे होत्याचे नव्हते अशी अवस्था झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
आज सद्यस्थितीत द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत आहे.या अवस्थेत सतत ढगाळ वातावरण व पाऊस होत असल्याने द्राक्षबागेत पानांवर व घडांवर डावणी यासारखे रोग वाढण्यास सुरुवात झाली आहे. फुलोऱ्यातील द्राक्षमण्यांची गळ आणि द्राक्ष घडांचे नुकसान होत असतानाच द्राक्षबागेत पावसाचे पाणी साचत असल्याने औषध फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालविणे मुश्किल होत आहे.
अनेक वेळा डबल ट्रॅक्टरद्वारे फवारणी करावी लागत असुन द्राक्षउत्पादक आता हतबल झाले आहेत.
सलग पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट त्यानंतर दोन वर्षांपासून कोरोनाची साथ, पुन्हा गारपीट, पाऊस या संकटामुळे दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी अमाप पैसा खर्च करून डोक्यावर बँकांच्या कर्जाचे हप्ते व औषध विक्रेत्यांचे देणे शेतकरी डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे पिचून निघालेला शेतकरीआज पुन्हा संकटात सापडला आहे.