एकात्मिक कीड व्यवस्थापनातून टाळा ज्वारीचे नुकसान

रब्बी ज्वारी पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, खोडकिडा, मावा, तुडतुडे या किडींचा व काणी (स्मट) व खडखड्या या रोगांचा प्रादूर्भाव होतो. एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास ज्वारीचे कीड व रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.

एकात्मिक कीड नियंत्रण
एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करून रब्बी ज्वारीवरील किडींचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली नियंत्रणात ठेवावा. यामध्ये योग्य त्या मशागत तंत्राचा अवलंब करून किडींवर नियंत्रण ठेवणे व किडींचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीत आल्यावरच औषधाची फवारणी करणे अभिप्रेत आहे. बांधावरील गवत, काडीकचरा, शेतातील पिकाची धसकटे व चिपाटे वेचून जाळून टाकल्यास त्यामध्ये असलेल्या किडींच्या कोषांचा नाश होतो. ज्वारीची शक्य तितक्या लवकर पेरणी केल्यास खोडमाशीपासून पिकांचे संरक्षण करता येते. पिकाची फेरपालट हासुद्धा एकात्मिक कीड व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा घटक आहे.
किटकनाशकांची फवारणी करण्यापूर्वी किडीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे किंवा नाही याचा अंदाज घ्यावा.

खोडमाशी
खोडमाशी ही ज्वारीचे सर्वात जास्त गंभीर स्वरूपाचे नुकसान करणारी कीड आहे. या किडीचा प्रादूर्भाव पीक एक आठवड्याचे असताना होते. पेरणीस उशीर झाल्यास खोडमाशीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. ही माशी घरात आढळणार्‍या माशीसारखीच; परंतु लहान व रंगाने करडी असते. मादी लांबट आकाराची, पांढर्‍या रंगाची अंडी रोपाच्या पानावर खालील बाजूस घालते. अंड्यातून २-३ दिवसांनी अळी बाहेर पडते आणि पोंग्यात शिरते व आतील सर्व भाग खाऊन टाकते. त्यामुळे पाने कोमेजतात व रोपाचे मधील पान पूर्णपणे वाळून झाड मरून जाते. याला ‘पोंगेमर’ असे म्हणतात. असे मेलेले पोंगे सहजासहजी उपसून येतात. जर या किडीचा प्रादूर्भाव थोड्या उशिरा झाला तर प्रभावित झाडांच्या बुंध्यापासून अनेक नवीन फुटवे येतात व अशा फुटव्यांनाही किडीचा प्रादूर्भाव होतो. किडीचे प्रमाण वाढल्यास पीक एकदम विरळ दिसू लागते व मग ते पीक मोडण्याशिवाय पर्याय राहत नाही. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी साधारण १० टक्क्यांपर्यंत ‘पोंगेमर’ आढळून आल्यास खोडमाशीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत झाला, असे समजावे व किटकनाशकाची फवारणी करावी.

रब्बी ज्वारीवर खोडमाशीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे प्रति हेक्टर कार्बोफ्युरॉन १३ टक्के दाणेदार १५ किलो पेरणीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

खोडकिडा
खोडकिडीची मादी तपकिरी रंगाची असून, पानाच्या खालच्या बाजूस मध्य शिरेजवळ १०-८० पुंजक्याने जवळजवळ ५०० अंडी घालते. ४ ते ५ दिवसानंतर अंडी उबतात व अळ्या बाहेर पडतात. पीक एक महिन्याचे झाल्यापासून कणसात दाणे भरेपर्यंत या किडीचा प्रादूर्भाव होऊ शकतो. सुरुवातीला खोडकिडीची अळी पोंग्यातील पानाच्या वरील पापुद्य्रावर जगते. त्यामुळे पानाच्या वरच्या बाजूवर लहान-लहान पारदर्शक व्रण आढळतात; पण खालच्या बाजूवर कसलीही इजा दिसत नाही. अशा वेळी खोडकिडीचा प्रादूर्भाव झाला असे समजावे. अळी पोंग्यात शिरते व कोवळ्या पानांवर उपजीविका करते. ज्वारीच्या नवीन उमलणार्‍या पानाला एका सरळ रेषेत छिद्रे पडलेली दिसतात. अळीने खोड पोखरल्यामुळे मधला पोंगा जळतो. अळी ताटात शिरल्यानंतर आतील गाभा खाते व ताट पोखरते. त्याला आतून लालसर रंग येतो. त्यामुळे ताट आणि कणीस वाळते व कणसात दाणे भरत नाहीत.

खोडकिडीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पिकाची धसकटे व इतर काडीकचरा शेतातून वेचून जाळून टाकावा, जेणेकरून त्यामध्ये लपलेल्या किडींचा नाश करता येईल. साधारणपणे १० टक्के झाडांवर छिद्रे असलेली पाने दिसू लागताच खोडकिडीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत झाला, असे समजून फवारणी करावी. २५ मि. लि. २० टक्के प्रवाही क्लोरोपायरीफॉस १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ट्रायकोग्रॅमा चिलेनिस या परोपजीवी किटकाची अंडी १.५० लाख प्रति हेक्टर याप्रमाणे पीक उगवणीनंतर ३० व्या व ४० व्या दिवशी शेतात सोडावीत.

मावा व तुडतुडे
हिरवा मावा ज्वारीच्या रोपावस्थेत नुकसान करतो. मावा पानातून मोठ्या प्रमाणात रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात व कालांतराने वाळतात. मावा किडीच्या शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर पडतो व पानांवर पसरतो. त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया मंदावते. पिवळा मावा पानाच्या खालच्या बाजूला राहून पानातील रस शोषून घेतो. या किडीचा प्रादूर्भाव खालच्या पानाकडून वरच्या पानाकडे वाढत जातो व झाडाची वाढ खुंटते.

तुडतुडे किडीची मादी पिवळसर करड्या रंगाची असते. तुडतुडे पोंग्याच्या पानातील रस शोषून घेतात. पाने पिवळी पडतात व झाडांची वाढ खुंटते. मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी १० मि. लि. ३० टक्के प्रवाही डायमेथोएट किंवा ८ मि. लि. २५ टक्के प्रवाही मिथिल डिमेटॉन किंवा ६ मि. लि. ३६ टक्के प्रवाही मोनोक्रोटोफॉस १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

रोग नियंत्रण
काणी (स्मट)
काणी या रोगाचे दाणे काणी, मोकळी काणी, झिपर्‍या काणी व लांब काणी असे चार वेगवेगळे प्रकार आढळतात. यापैकी दाणे काणी व मोकळी काणी हे प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळतात.

दाणे काणी (ग्रेन स्मट)
काणी रोगाच्या या प्रकारात ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याऐवजी तेथे काणीयुक्त बुुरशीफळे तयार होतात. असे काणीयुक्त पांढरे दाणे टोकास निमुळते होते व फोडले असता त्यातून काळी भुकटी म्हणजे रोगाचे बिजाणू बाहेर पडतात.

मोकळी काणी (लुज स्मट)
या रोगाची लागण झालेली झाडे लवकरच फुलोरावस्थेत येतात व अशा झाडांना जास्त फुटवे येतात. कणीस अतिशय मोकळे असून, सर्व बिजांडात या रोगाचा संसर्ग होतो. प्रादूर्भाव झालेली कणसे मोकळी असतात व रोगट कणसात दाण्याऐवजी बुरशीफळे तयार होतात.

काणी हा बियाण्यामुळे होणारा रोग असल्यामुळे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, त्याकरिता व्हिटाव्हॅक्स २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यांस लावावे. रोगट कणसे काढून नायनाट करावा. रोगग्रस्त बियाणे वापरू नये.

खडखड्या (चारकोल रॉट)
रोगट झाडाचे खोड पोकळ होते आणि बुरशीचे काळ्या बारीक कणांनी वेष्टिलेले लांब धागे आढळतात. झाड हलल्यास खडखड असा आवाज येतो व वार्‍याने अथवा धक्क्याने झाड आडवे पडतेे. या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी तसेच जमिनीत पालाश कमी असल्यास त्याची योग्य मात्रा खताद्वारे द्यावी. आंतरपीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी होते. मिश्र व आंंतरपीक उदा. मूग, उडीद, सोयाबीन इ. घेतल्यास जमिनीचे तापमान कमी राहण्यास मदत होते व रोगाचे प्रमाण कमी करता येते. पीक फुलोर्‍यावर असताना पाण्याचा ताण आल्यास शक्य असल्यास एखादे ओलीत द्यावे.

– डॉ. व्ही. व्ही. काळपांडे
ज्वारी पैदासकार
– एस. ए. भोंगळे
कनिष्ठ संशोधन सहाय्यक
– डॉ. आर. बी. घोराडे
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ
ज्वारी संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला