पीकविमा : बीड जिल्हा राज्यात अव्वल

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक

बीड : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत सर्वात उशीरा पीकविमा कंपनी मिळालेल्या बीड जिल्ह्यात ३१ जुलै अखेर तब्बल १७ लाख ७१ हजार पीकविमा अर्ज आले असून, ही संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. अवघ्या १३ ते १४ दिवस वेळ असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा प्रस्ताव पूर्ण केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच जिल्ह्यातील जागरूक शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे.

खरीप हंगामाचे ५ लाख ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या बीड जिल्ह्यात मागील सरकारच्या काळात पिकविम्यासाठी सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे कोणतीही पीकविमा खरीप हंगाम २०२० साठी निविदा प्रक्रियेत सहभागी झाली नव्हती. रब्बी हंगाम २०१९ मध्ये असे घडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यावेळी पिकविम्यापासून वंचित राहावे लागले होते.

मात्र यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः कोरोना पासून मुक्त झाल्यापासून पिकविम्याचा प्रश्न प्रतिष्ठेचा करत जिल्ह्यासाठी ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कम्पनी नियुक्त करून घेतली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारण १७ जुलैपासून ३१ जुलै पर्यंत असा जवळपास १४ दिवसांचा कालावधी आपले विमा हफ्ते भरून आपले पीक विमा संरक्षित करण्यासाठी मिळाला होता.

दरम्यान ३१ जुलै अखेर पीकविमा भरण्याच्या मुदतीअंती सोयाबीन साठी  ६ लाख ८७ हजार, कापसासाठी २ लाख ५१ हजार या प्रमुख पिकांसह तूर, मूग, उडीद, बाजरी आदी पिकांचे मिळून एकूण तब्बल १७ लाख ७१ हजार ८८१ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. याद्वारे शेतकऱ्यांनी जवळपास ६ लाख हेक्टर पीक क्षेत्रासाठी ६० कोटी रुपये रक्कम आपला विमा सहभाग म्हणून भरली असून याद्वारे २ हजार ४६४ कोटी रुपये इतकी विमा रक्कम संरक्षित करण्यात आली आहे.

दरम्यान पेरणी क्षेत्र कमी आणि विमा क्षेत्र अधिक असे कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी केंद्राच्या महानोबेल या संस्थेच्या माध्यमातून सॅटेलाईट द्वारे पिकक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

अत्यंत कमी कालावधीत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी विभागाने प्रभावी यंत्रणा राबवित जिल्ह्यात विक्रमी संख्येने पिकविमा प्रस्ताव भरले याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम तसेच संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे व पीक विम्याबाबत अतिशय जागरूक असलेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.