डरना जरूरी है; तो परत आलाय!

तो आता कमी झाला किंवा काही ठिकाणी अजिबात नसल्याने लोकांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती. अनेकांनी रस्त्यावर थुंकायला सुरुवात केली तर बहुतांश जणांनी मुखावरण काढून टाकले. भरपूर लोकसंख्या असल्याने गर्दी तर अटळच! अशा परिस्थितीत व्हायचे तेच झाले. तो परत आलाय! तो म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कोविड १९ आहे.

ओडिशा राज्यातील ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील सरकारी अनुदानित हायस्कूलच्या ५३ विद्यार्थिनी तर संबलपूरमधील बुर्ला येथील ‘वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रीसर्च’मधील एबीबीएसर्च्या २२ विद्यार्थ्यांना कोविड १९ चा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या सर्व विद्यार्थिनी गेल्या तीन दिवसांत कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. .

या मुलींना वेगळे ठेवण्यात आले असून त्यांच्या उपचारासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सामान्य आहे, तर शैक्षणिक संस्था एका आठवड्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे,

ओडिशातील कोविड-१९ ची संख्या आज १०,४७,३८६ वर पोहोचली आहे. ७० मुलांसह आणखी २१२ जणांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

आता कोविड-१९ चा संसर्ग झालेले विद्यार्थी इयत्ता आठवी,नववी आणि दहावीमध्ये शिकत आहेत आणि त्यांच्यापैकी बहुतेकांना सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दिसून आली होती. बुर्ला येथील २२ एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या संस्थेच्या वार्षिक समारंभातून संसर्ग पसरला असावा असे समजण्यास वाव आहे.

मधल्या काळात ओडिशामध्ये संसर्गाच्या प्रसारामध्ये लक्षणीय घट झाली असताना, सुंदरगड आणि संबलपूर या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये अचानक वाढलेली प्रकरणे चिंतेचे कारण आहेत. आपल्याइथेही आता शिक्षणसंस्था सुरू झाल्या असून मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ‘डरना जरूरी है.’