राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून संपावर असलेले एसटी कर्मचारी माघार घेत नसल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. हा संप आणखी चिघळू नये यासाठी पवार यांनी दोन्ही बाजुंनी आवाहन केले होते.
त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेत असल्याने संपाबाबत कोण निर्णय घेणार अशी निर्णायकी स्थिती राज्य सरकारमध्ये आहे. शेतक-यांच्या आंदोलनासारखे हे आंदोलन पेटून नये असे सरकारमधील घटक पक्षांना वाटत आहे. त्यामुळे कॉंग्रेसनेही याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीनेही तसा आग्रह धरला आहे.
एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत दोन्ही बाजुंनी तुटेपर्यंत ताणू नये असा सल्ला देणा-या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर या प्रकरणी पुढाकार घेतला आहे. ते मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची बैठक घेत असून या संपाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
परिवहन खाते शिवसेनेकडे असल्याने शिवसेनाच पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच त्यावर निर्णय घेतील असे परब वारंवार सांगत आहेत. मुख्यमंत्री विश्रांती घएत असल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी वेळ लागत आहेत. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळू शकते. भाजपने यात आक्रमक भूमिका घेतली असून ते राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यातच राज्यभरातील कामगारांनी मुंबईत येऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार व अनिल परब यांच्यात ही बैठक होत आहे.