दहावी-बारावीनंतर रिअल इस्टेटमधील करिअर

रिअल इस्टेट उद्योग झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी २०२२ पर्यंत रिअल इस्टेट क्षेत्रात १९० बिलियन डॉलर्स गुंतवणूक होण्याची शक्यता वर्तवलीय. दिवसागणिक या क्षेत्रात विविध प्रकराचे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

या क्षेत्रात कौशल्ययुक्त मनुष्यबळाची कमतरता ४ कोटीच्या आसपास असल्याचे उद्योजकांचे निरीक्षण आहे. २०२२ पर्यंत ७५ लाख कौशल्ययुक्त मनुष्यबळास रोजगराच्या संधी मिळू शकतात. या कंपन्यांना कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज आहे. रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲण्ड डेव्हलपमेंट ॲक्ट) सारखा कायदा ग्राहकांच्या हितासाठी आल्याने रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक व्यावसायिकरीत्या आणि पारदर्शकरीत्या काम करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात विपणन, विक्री , सेल्स, वित्त, प्रशासन, जनसंपर्क अशा विविध संधी मिळू शकतात.

व्यवस्थापन आणि विपणन

रिअल इस्टेट बिझिनेस मॅनेजमेंट आणि रिअल इस्टेट मार्केटिंग व सेल्स हे अभ्यासक्रम याअनुषंगाने उपयुक्त ठरु शकतात. या अभ्यासक्रमात या क्षेत्राची विस्तृत माहिती, कायदेशीर बाबी, कागदपत्रांची जुळवाजुळव, विविध परवाने, बांधकाम प्रक्रिया, विक्री, इतर तांत्रिक बाबी शिकवल्या जातात.

रियल इस्टेट क्षेत्रासाठी गृहवित्त आणि सूक्ष्म वित्तची गरज भासते. त्यामुळे या क्षेत्रासाठी मनुष्यबळ लागते. स्थापत्य अभियंत्यांना रिअल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कंस्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये संधी उपलब्ध होते. वास्तुकला अभियंते, लेखा पदवीधर, विधि पदवीधरांनी हा अभ्यासक्रम केल्यावर त्यांच्या कौशल्यात वृध्दी होऊ शकते. रेरा अधिनियमानुसार कम्प्लॉयन्स ऑफिसर, कस्टमर रिलेशनशीप ऑफिसर, प्रोजेक्ट मॅनेजर यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

मनुष्यबळाची गरज

(१) स्पेशलाइज्ड मनुष्यबळ- यामध्ये व्हॅल्युअर, क्वालिटी सर्व्हेअर, फॅसिलिटी मॅनेजर, प्रॉपटी मॅनेजर, सस्टनेबल डेव्हलपमेंट एक्सपर्ट यांचा समावेश होतो.

(२) प्रमुख मनुष्यबळ – यामध्ये इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि प्लॅनर यांचा समावेश होतो.

(३) इतर साहाय्यक मनुष्यबळ- यामध्ये व्यवस्थापन, व्यवसाय प्रशासन, सनदी लेखापाल, विपणन अधिकारी, विक्री अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, वित्तीय नियंत्रक किंवा विश्लेषक, वकील, रेरा कम्प्लॉयन्स ऑफिसर, ग्राहक संपर्क आधिकारी इत्यादींचा समावेश होतो.

आवश्यक गुण

(१) उत्तम मौखिक संवाद कौशल्य, (२) व्यावसायिक शिष्टाचार, (३) सादरीकरण कौशल्य, (४) नेतृत्व कौशल्य, (५) निर्णय क्षमता, (६) संसाधनांची हाताळणी, (७) व्यवस्थापन माहिती प्रणाली, (८) वाटाघाटीची तंत्रे, (९) विश्लेषण कौशल्य, (१०) ग्राहक हाताळणी कौशल्य,(११) दस्तऐवजीकरण आणि अहवाल लेखन,(१२) विवाद/ संघर्ष व्यवस्थापन, (१३) कार्यालय व्यवस्थापन

या उद्योगात, सल्ला मार्गदर्शन, ब्रोकरेज अशा सेवाही लागतात. नव्या अधिनियमानुसार ब्रोकरेज क्षेत्र हे अधिक सुव्यस्थित होणार आहे. यात व्यावसायिकता येईल व पारदर्शक कार्यप्रणाली विकसित होईल. त्यामुळे या क्षेत्रात नव्या करिअर संधी निर्माण होतील.

प्रशिक्षण संस्था-

रिअल इस्टेट मॅनेजमेंट इंस्टिट्यूट- या संस्थेमार्फत रिअल इस्टेट बिझिनेस मॅनेजमेंट ॲण्ड हाउुसिंग फायनांस हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये रिअल इस्टेट व्यवसाय व्यवस्थापनाच्या विविध संकल्पना शिकवल्या जातात. कौशल्यवृध्दीसाठी साहाय्य केले जाते. इंटरनेट मार्केटिंगची कौशल्ये शिकवली जातात. करार प्रक्रियेची माहिती दिली जाते. रिअल इस्टेट आणि गृहनिर्माणासाठी लागणाऱ्या वित्तीय बाबी, कर्ज प्रक्रिया, कायदेशीर बाबी यांची माहिती दिली जाते. कर आकारणीचे स्वरुप शिकवले जाते. बांधकामाच्या प्रारंभापासून ते ग्राहकास सदनिकेची विक्री करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रकियेचे संनियंत्रण कसे करावे याची माहिती दिली जाते. प्रकल्प व्यवस्थापनाच्या मुलभूत बाबी शिकवल्या जातात. ग्राहकांशी उत्तम संबंध कसे निर्माण करावे यासाठी टिप्स दिल्या जातात. नेतृत्व गुण विकसित केले जातात. उपलब्ध संसाधनांचा उत्तम  व प्रभावी उपयोग कसा करावा, याचे तंत्र शिकवले जाते. कामगार कायद्याची माहिती करुन दिली जाते. कामगार व कर्मचाऱ्यांच्या कामाचे विश्लेषण करणे, चांगल्या कामगार,कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, आदी बाबीही शिकवल्या जातात.