शेतकरी बांधवांनो; क्रेडिट कार्ड वापरताना अशी घ्या काळजी

क्रेडिट कार्डची निवड करताना आणि वापरताना हुशारी वापरली, तर त्याचा उपयोग सोईचा व फायदेशीरही ठरेल.

१. “लाईफटाईम फ्री
खरोखरच “लाईफटाईम फ्री (रिन्युअलसकट कोणतेही प्रत्यक्ष किंवा छुपे चार्जेस नसलेले)” असलेली क्रेडीट कार्ड्स बहुतेक बँकामध्ये विशिष्ट अकाऊंट्सना मिळतात. असे क्रेडीट कार्ड,
पैसे खिशात किंवा अकाऊंटमध्ये नसतानाही, खरेदी शक्य असण्याची सोय व खरेदीच्या किंमतीवरचे (प्रत्येक बँकेच्या नियमांप्रमाणे ३० ते ६० दिवसांचे) व्याज वाचविण्याची सोय, असा दुहेरी फायदा मिळविण्याचे उत्तम साधन आहे.

२. क्रेडिट कार्ड बँक अकाऊंटबरोबर करावे लिंक
आपल्या बँक अकाऊंटबरोबर लिंक करावे आणि त्यातून संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल देय तारखेला ऑटोमॅटिकली वसून केले जावे, हा पर्याय न चुकता स्विकारावा. कितीही मोह झाला तरी, मिनिमम बिल भरणे हा पर्याय स्विकारू नये. तो महागडा पर्याय आहे.
पैसे वसूल केले जाण्याच्या आधी एक दिवस पुरेसे पैसे आपल्या लिंक्ड अकाऊंटमध्ये असल्याची खात्री करावी… फार मोठी खरेदी केलेली नसल्यास, बहुदा पुरेसे पैसे बहुतेक लोकांच्या खात्यात असतात व चिंतेचे कारण नसते. कारण “लाईफटाईम फ्री” क्रेडीट कार्ड्स वापरणारे सहसा “पे चेक ते पे चेक” जीवन जगत नसतात.

३. क्रेडिट कार्ड वापरताना :
क्रेडिट कार्ड अशाच खरेदीसाठी वापरावे, जिची किंमत आपल्याला क्रेडिट कार्डाच्या वेळेच्या सीमेआधी, आपल्या लिंक्ड अकाऊंटमध्ये तयार ठेवता येईल. तसे शक्य नसल्यास, ती खरेदी तसे शक्य होईल अशा वेळेपर्यंत, पुढे ढकलावी अथवा टाळावी… थोडक्यात, अंथरूण पाहून पाय पसरावे, आणि क्रेडिट कार्ड फक्त ‘आपल्या आवाक्यातल्या काळापर्यंतच’ अंथरूण ताणण्यासाठी वापरावे. याबाबतीत, अवास्तव आत्मविश्वास महाग पडू शकतो. मात्र, अवास्तव आत्मविश्वास ही क्रेडिट कार्डची चूक नसते, हे नक्की लक्षात ठेवावे.