शेतकरी करणार आता ई- पंचनामा

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर वेळेत पंचनामा होतो की नाही याची चिंता शेतकऱ्यांना असते. त्यामुळे ‘ई- पीक पाहणी’ प्रमाणेच आता ‘ई-पंचनामा’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. ई- पंचनामा प्रणाली आणून थेट शेतक-यांनाच पंचनाम्याचे अधिकार देण्यासाठी लवकरच धोरण आणले जाण्याची शक्यता आहे. ‘ई-पंचनामा’ प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महसूल विभागाकडून स्वतंत्र अॅप तयार केले जाणार आहे. जे ‘ई-पीक पाहणी’ च्या धर्तीवरच तयार केले जाणार आहे.

पूर्वी पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनाच तलाठी कार्यालयात खेटे मारावे लागत होते. मात्र, एकाच तलाठयाकडे अनेक गावांचा कारभार असल्याने पीक पाहणी वेळेत होत नसल्याने अनेक शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागत होते. यावर ‘ई-पीक पाहणी’ च्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध झाला होता. त्याच धर्तीवर आता ‘ई-पंचनामा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. ‘ई-पंचनामा’ प्रणालीद्वारे नुकसानग्रस्त पिकाचे फोटो काढून गट क्रमांक व अक्षांश-रेखांशच्या नोंदी ह्या स्वतः शेतकऱ्यालाच आपल्या मोबाईलमधून ऑनलाइन सादर करावे लागणार आहे. तलाठ्यांना ही माहिती तपासून अंतिम मान्यता देण्याचे अधिकार दिले जाणार आहेत. मात्र, ही प्रक्रिया कशी असणार आहे, याबाबत सांगण्यात आले नाही.