जीवनशैलीतील बदलाने मधूमेहावर करता येते मात

डायबेटीस किंवा मधुमेहाची तक्रार अलिकडे सामान्य झाली आहे. हा मुख्यत: जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. लहानथोर, ग्रामीण शहरी, गरीब-श्रीमंत असा कोणालाही तो होऊ शकतो. वेळीच योग्य ती काळजी घेतली तर डायबेटीसवर नियंत्रण मिळवता येते, तसेच जीवनशैलीतील योग्य बदल, जसे की व्यायाम, आहार इत्यादी केले तर मधूमेहाचा धोका टाळता येऊ शकतो. आजच्या या दिवसानिमित्त आपण मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

लठ्ठपणामुळे हृदयरोग व मधुमेह हे आजार होतांना दिसून येतात. मधुमेह हा आजार आता अनुवांशिक राहिलेला नसून तो आता पांढरा डायबेटिज म्हणून ओळखला जातो. हा मधुमेह कधीही बरा होत नाही. त्यासाठी योग्य आहार व योग्य व्यायाम ह्या दोघांच्या माध्यमातून त्याचे समतोल राखता येते. भारतीय जीवन शैलीमध्ये जो आहार घेतला जातो त्या आहारात प्रामुख्याने ६०% साखर रोज खाल्ली जाते. म्हणून यासाठी योग्य तो व्यायाम करुन आहाराचा समतोल राखून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मानवी जीवनात कॅन्सर, हृदयरोग आणि किडनी संबंधीचे आजार हे जीवन शैलीशी निगडीत आहेत. ह्या आजारांमुळे व्यक्तीचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात येते. म्हणून या आजारांविषयी योग्य ती जाणिव जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी आहारात काय खावे व काय खावू नये जेणेकरुन हे आजार टाळता येतील.

मधुमेह झाल्यावर वजन वाढू लागते त्यानंतर आळस येतो, काम करायला उत्साह येत नाही, अनावर झोप येणे, मानेवर काळी रेघ येणे त्यासाठी कितीही उपाय केले तरी ती न जाणं/ चेहरा काळा पडणे, तसेच चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे ही या आजाराची प्री-डायबेटिक लक्षणे आहेत. या लक्षणांवर जर वेळीच योग्य उपाय केला तर मधुमेह या आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो.