कोरडवाहूसाठी पर्याय रब्बी ज्वारी

दुष्काळी परिस्थितीत रब्बी ज्वारी ही अन्नधान्यासाठी तसेच गुराढोरांना लागणार्‍या कडब्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. रब्बी ज्वारीचा पेरणीचा कालावधी फार महत्त्वाचा आहे. ज्वारीची वाढ ही ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाच्या ओलाव्यावर अवलंबून असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास येणार्‍या रब्बी हंगामात निश्‍चितच रब्बी ज्वारीचे उत्पादन व उत्पादकता वाढेल.

रब्बी जातीचे सुधारित वाण
रब्बी ज्वारीसाठी अजूनही शेतकरी पारंपरिक जातीचे तसेच घरगुती बियाण्यांचा वापर करतात. यामुळे उत्पादन कमी येते. उत्पादन चांगले येण्यासाठी शेतकर्‍यांनी सुधारित वाणाचाच वापर करावा.

वाढ खुंटलेल्या कपाशीत पेरणी
वाढ खुंटलेल्या कपाशीतसुद्धा रब्बी ज्वारीची पेरणी करता येईल. ही पेरणी उभ्या कपाशीच्या चार ओळीनंतर (म्हणजेच दोन ओळींमध्ये) करता येते. तसेच हरभरा, करडी यांसारखे पीक कपाशीच्या प्रत्येक दोन ओळींमध्ये घेता येऊ शकते.
बियाण्यांंचे प्रमाण व बीजप्रक्रिया
रब्बी ज्वारीमध्ये ताटांची संख्या ही १ लाख २० हजार ते १ लाख ३५ हजारांपर्यंत राहणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून बियाण्यांचे प्रमाण ४ किलो प्रति एकर एवढे आवश्यक आहे. यासाठी प्रमाणित बियाण्यांंचाच वापर करावा.

बीजप्रक्रिया
वास्तविक पाहता शेतकर्‍यांनी प्रमाणित बियाणे वापरावे. जर शेतकर्‍यांकडे घरगुती शुद्ध बियाणे उपलब्ध असेल तर त्यास गंधक (३०० मेश पोताचे) ५ ग्रॅम प्रतिकिलो म्हणजेच एकरी २० ग्रॅम किंवा ३ ग्रॅम थायरम प्रतिकिलो म्हणजेच एकरी १२ ग्रॅम बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे ज्वारीमधील सर्वात महत्त्वाचा रोग ‘कान्ही’ जो की, जमिनीतून बियाण्यांद्वारे किंवा हवेमार्फत होतो याचा बंदोबस्त होतो.

पेरणी (लागवडीचे अंतर)
शेतकरी बहुधा ज्वारीची पेरणी ही अरुंद ओळीमध्ये करतात. यामुळे ज्वारीचे उत्पादन कमी येते. रब्बी ज्वारीची पेरणी रुंद ओळीवर केल्यास कोळपणीचे काम सहजगत्या करता येते. रब्बी ज्वारीची पेरणी रुंद ओळीवर केल्यास कोळपणीचे काम सहजगत्या करता येते. तसेच जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकून पिकाच्या शेवटच्या अवस्थेतसुद्धा ओलावा उपलब्ध राहू शकतो. त्यामुळे दाण्याची संख्या व दाणे भरण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होऊन उत्पादनात भर पडते. यासाठी रब्बी ज्वारीची पेरणी ही ४५ सें. मी. म्हणजेच १८ इंचावर करावी. ही पेरणी खोल म्हणजे १० ते १२ सें. मी. खोलीवर करावी. यामुळे जमिनीतील खोलवर असलेल्या ओलाव्याचा उपयोग होऊन मुळाची वाढ योग्यरीत्या होते.

रासायनिक खतांचा वापर
शेतकरी रब्बी ज्वारीस खतांची मात्रा फार कमी देतात किंवा देतच नाही. विद्यापीठातील प्रयोगानुसार कोरडवाहू परिस्थितीतसुद्धा रब्बी ज्वारी ही रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते, असे आढळून आले आहे. त्यासाठी कोरडवाहू परिस्थितीत १६ किलो नत्र, ८ किलो स्फूरद व गरज असल्यास ८ किलो पालाश प्रतिएकरी पेरणीपूर्वी आठ दिवस किंवा पेरणी करतानाच खोलवर द्यावे. थोडक्यात युरिया ३५-४० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो व म्युरेट ऑफ पोटॅश १०-१५ किलो प्रतिएकरी वापरावे.

खत खोल का पेरावे व कसे?
कोरडवाहू परिस्थितीत रब्बी ज्वारीची पेरणी झाल्यानंतर पहिल्या २० ते २५ दिवसांच्या कालावधीत जमिनीच्या पृष्ठभागातील ८ ते १० सें. मी. थरातील ओलावा बराचसा कमी होतो व त्यामुळे १० सें. मी. पर्यंत खोल पेरलेल्या खताचा उपयोग पूर्णपणे होत नाही. यासाठी रासायनिक खते अधिक खोलवर म्हणजेच १५ सें. मी. एवढे खोल दिल्यास खतांची कार्यक्षमता वाढते व पिकास जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होते.

बियाणे व खत हे दोन्ही एकत्र पेरणीसाठी शेतकर्‍यांनी दोन चाड्याची तिफण वावरावी. जेणेकरून खत हे बियाण्यांखाली २-३ सें. मी. पडेल. ही दोन चाड्याची तिफण उपलब्ध नसल्यास खत सुरुवातीस पेरणी करून द्यावे व तद्नंतर बियाणे पेरावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत खत फेकून देऊ नये. खत व बियाणे सोबत पेरण्याच्या दृष्टिकोनातून तसेच खोल पेरणीसाठी परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात सुधारित दुफण/तिफण तयार करण्यात आली आहे.

आंतरमशागत
*    ज्वारीच्या पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपांतील अंतर हे १५ सें. मी. ठेवून अधिक रोपांची विरळणी करावी.
*    जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडून जमिनीतील ओलावा फार मोठ्या प्रमाणावर उडून जातो. तसेच तणाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व जमिनीच्या ओलाव्यानुसार १ ते २ कोळपण्या व निंदणी करावी.
वरील सर्व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आजच्या दुष्काळी परिस्थितीत ज्वारीचे अधिकाधिक उत्पादन घेता येईल. तसेच अन्नधान्य व जनावरांसाठी चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल.

कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद
दूरध्वनी क्र. ०२४०-२३७६५५८