रब्बी हंगामात पाण्याची कमतरता भासणार नाही असे नियोजन करा

नागपूरदि. 10 : अतिवृष्टी व अनियमित पाऊसामुळे खरीप हंगामाची स्थिती चांगली नाही. रब्बी हंगामात पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात असल्याने हंगाम चांगला झाला पाहिजे तरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कृषी विषयक कामे चांगली होतील व शेतकरी सुखावेल, अशी आशा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रब्बी हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन सिंचन भवन येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी सभापती तापेश्वर वैध, राजेंद्र मोहिते, मिलिंद शेंडे, गौतम वागदे, पंकज देशमुख, डॉ.नलिनी भोयर, बी.व्ही. सयाम, पवन भारशंकर, विजय सोनटक्के तसेच जलसंपदा, कृषी व सहकार विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कृषी विभागाने बी-बियाण्यांचे योग्य नियोजन करुन शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दयावे. जलसंपदा विभागाने सिंचन व्यवस्था व बंधारे यांच्या सद्यस्थितीबाबत बैठकीचे आयोजन करुन त्या साधन सामुग्रीबाबत नियोजनबध्द व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या.

शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे देण्याच्या सूचना करुन रब्बी हंगामात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाहनाने कृषी विभागाने गावागावात जावून पीकांच्या माहितीचे पाम्पलेट वाटावे, त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन प्रक्रियेत मदतच होणार आहे. तालुकास्तराव गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांची बैठक घेऊन नियमित आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात बंधाऱ्यांत पाण्याचा साठा 91 टक्के आहे, पाण्याचे योग्य नियाजन करा. टेल टू हेट नुसार पाणी पुरवठा करा. पाणी वाटप सहकारी संस्थाच्या पातळीवर बैठका घेऊन समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. फरदळी निर्मुलन कार्यकमाची मोहिम राबवा. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनाच्या निधीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दखल कृषी, सहकार व जलसंपदा विभागाने घ्यावी, असे त्यांनी सांगितले. सर्व यंत्रणांनी एकत्र मिळून समन्वयाने काम करा, रब्बी हंगामात उत्पन्न वाढीवर प्राधान्याने भर दया, अशी सूचना त्यांनीदिल्या.

रब्बी हंगाम 1 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रात असून 1 लाख 80 हजारा हेक्टरचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यात गहु 87 हजार हेक्टर व हरभरा 91 हेक्टरवर लावण्यात येणार आहे. इतर मागासवर्ग महामंडळाच्या महाज्योतीद्वारे प्रथमच नावीण्यपूर्ण योजनेनुसार करडई व जवसाचे उत्पादन जिल्हयात घेण्यात येणार असल्याचे श्री. वागदे यांनी सांगितले.