सोलापूर/पंढरपूर, दि. 8 :- संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी अनुक्रमे 231 व 130 किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण 12 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
पंढरपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचे कळ दाबून आभासी प्रणालीद्वारे करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचे सचिव गंगाधर अरमाने, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, या पालखी महामार्गामुळे या भागातील विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशीही चांगला संपर्क निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवले जाणार असून या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या जाव्यात. पंढरपूरच्या वारीला अनेक वर्षांची परंपरा असून या ठिकाणी भरणारी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा आहे. शेकडो वर्षाची गुलामी, नैसर्गिक आपत्तीमध्येही वारी सुरूच होती. आजही अविरत सुरु आहे. या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नसून ही जगाला समानतेचा संदेश देणारी ही वारी असून या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा समान असतो असे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर महामार्गाची निर्मिती केली जात असून प्रत्येक गाव व खेडे रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरीलाही पालखी महामार्गाने जोडले जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. या रस्त्यामुळे सांस्कृतिक प्रगतीबरोबरच या भागाच्या विकासाला अधिक चालना मिळून येथे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल. रोजगार निर्मितीही होणार असल्याने हे मार्ग म्हणजे विकासाचा नवा प्रवाह असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करून पंढरीची वारी ही स्त्री पुरुष समानतेचे प्रतिक असल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी या भागातील नागरिकांकडून पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सावली देणारे वृक्ष लावणे, पालखी मार्गावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे व भविष्यात पंढरपूर हे भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच येथील जनसमुदायाशी काही वेळ मराठी भाषेतूनही त्यांनी संवाद साधला.
पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पालखी महामार्गाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग असून या पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच वाखरी येथे वारकऱ्याकडून रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर हेही महामार्गाने जोडण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालखी महामार्ग तसेच महाराष्ट्रातून जाणारे रस्ते निर्मितीत महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक पाऊल केंद्रासोबत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून पंढरपूरकडे म्हणजेच भक्तिमार्गाकडे जाणारे रस्ते चांगलेच असले पाहिजेत असे सांगून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी विठूमाऊलीचा आशीर्वाद असेल असेही त्यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारीची परंपरा जपलेली आहे. त्या वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात राज्य शासनाचाही पुढाकार असेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्राच संतांची भूमी असून पंढरपूर हे विशेष प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. पालखी महामार्गाच्या माध्यमातून येथील सांस्कृतिक ठेवा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र शासनाच्या वतीने देशभरात विविध राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण केले जात असून यामध्ये भारत माता योजना, राम गमन मार्ग, राम जानकी मार्ग, बुद्धिस्ट सर्कल, मानस सरोवर मार्ग निर्माण केले जात आहेत, असे श्री. गडकरी यांनी सांगितले.
त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग हा 231 किलोमीटरचा असून यासाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे. हा एकूण पाच पॅकेजमध्ये केला जात असून त्यातील चार पॅकेजचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तर संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी 130 किलोमीटर असून यासाठी पाच हजार कोटीची तरतूद केलेली असून या कामास सुरुवात झालेली असल्याची माहिती श्री गडकरी यांनी दिली. राज्य शासन 1438 कोटी रुपये या महामार्गासाठी देणार असून या महामार्गावरून वारकऱ्यांना सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
वाखरी ते पंढरपूर रस्ता पालखी महामार्गात पूर्वी समाविष्ट केलेला नव्हता परंतु या साधारण पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी 74 कोटीचा निधी मंजूर करण्यात येत असून या रस्त्याचाही महामार्गात समावेश केला असल्याची माहिती श्री. गडकरी यांनी दिली.
प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण 13 महामार्ग प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आभासी प्रणालीद्वारे कळ दाबून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्पूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाच्या प्रतिकृतीची पाहणी करून याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर या महामार्गाच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा यांच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे प्रमुख श्री योगेश देसाई व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे प्रमुख श्री मोरे यांचा सत्कार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
या 13 महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास खासदार सर्वश्री जय सिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर , आमदार सर्वश्री प्रशांत परिचारक, बबनदादा शिंदे, चंद्रकांत पाटील, समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मान्यवर तसेच संत मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.