दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तेजोमय असा हा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य आणि सुख, समृद्धी, संपन्नता घेऊन येवो अशी शुभकामनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, दिवाळी सण सर्वांच्या आयुष्यात प्रकाश, तेज आणि चैतन्यदायी असे पर्व घेऊन येतो. हा उत्सव अंधाराला भेदून प्रकाशमान वाटा शोधण्याची प्रेरणा देतो. आपल्या सगळ्यांसमोर आरोग्याचे संकट उभे राहिले. या अंधाराला भेदून पुढे जाताना आपल्याला अस्वच्छता, प्रदूषण टाळण्याची आणि आरोग्यदायी सवयी, पर्यावरणाची काळजी घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. या सकारात्मक गोष्टी आता आपल्याला आयुष्यभर जपाव्या लागतील. त्यांचा वसा पुढच्या पिढीला द्यावा लागेल. प्रकाशपर्वात प्रत्येक पणती तिमिराला भेदण्याची जबाबदारी घेते. त्याचप्रमाणे आपण सर्व कटिबद्ध होऊया. आरोग्यदायी गोष्टींसाठी पुढाकार घेऊया ज्यातून आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि संपन्नता येईल. त्यासाठी या तेजोमय, मंगलमय, प्रकाशपर्वाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!!
यंदाची दिवाळी कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो, नियम पाळून आरोग्यदायी दिवाळी साजरी करुया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. दिवाळीतील दिव्यांच्या रोषणाईनं अंध:कार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमय होवो. यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा, सर्वांना सोबत घेऊन आनंद साजरा करण्याचा सण. दिवाळीतील दिव्यांच्या प्रकाशानं आपल्या सर्वांच्या जीवनातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी परंपरांचा अंध:कार दूर होवो. राज्यातल्या प्रत्येक घरात धन-धान्य, सुख-शांती, उत्तम आरोग्याची समृद्धी येवो. दिवाळी साजरी करत असताना समाजातील गरीब, वंचित, दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करुन घेण्याची परंपरा आपण यंदाही कायम ठेवूया. कोरोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आरोग्यदायी दिवाळी साजरी करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.