कृषी हवामान सल्ला : २७ ते ३१ ऑक्टोबर २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  मराठवाडयात पूढील पाच दिवसात किमान तापमान 15.0 ते 19.0 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी. कापूस पिकात दहीया रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एस सी 10 मिली  किंवा क्रेसोक्सिम –मिथाइल 44.3% एस सी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात अंतरीक बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 25 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी तसेच बाह्य बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 25 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. बागायती रब्बी ज्वारीची पेरणी करतांना 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.बागायती करडई पिकाची पेरणी 5 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 10-12 किलो बियाणे वापरावे. बागायती करडई पेरणीसाठी 60 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे व  प्रति झाड 50 ग्रॅम नत्र खत मात्रा द्यावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह फवारणी करावी.  नविन लागवड केलेल्या आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी केली नसल्यास छाटणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. रब्बी हंगामात भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर रोपे तयार केली असल्यास रोपांना आवश्यकतेनूसार झाऱ्याने पाणी द्यावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुलपिकात आंतरमशागतीची कामे करून तण  नियंत्रण करावे.

पशुधन व्यवस्थापन

पशूधनात बाह्य परजीवी (ऊवा, पिसवा, गोचीड व चावणाऱ्या कीटकवर्गीय माशा) यांच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा वनस्पतीजन्य  कीटकनाशक (कडूनिंब तेल 15 मिली + कारंज तेल 15 मिली + 2 ग्रॅम मऊ साबण + 1 लिटर पाणी) हे द्रावण आठवडयाच्या अंतराने पशुधनावर, गोठ्यामध्ये सभोवताली साचलेल्या पाण्याचे डबके, खच खळगे/नाली व शेणाच्या ढिगाऱ्यावरती फवारावे. हे वनस्पतीजन्य कीटकनाशक कीटक रोधक व कीटक/गोचीडाचे जीवनचक्र तोडून त्यांची संख्या घटवण्यासाठी मदत करते.

सामुदायिक विज्ञान

कुटूंबातील जमा-खर्च बचत यांची योजना म्हणजे कौटुंबिक अंदाजपत्रक होय. अंदाज पत्रकामूळे घर खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी